नाटकाचं नाव ‘बोल्ड’ वाटाव असं होतं. ते देणं हे एक धाडसच होतं पण गोर्लेंनी ते केलं, कारण खूप विचार करूनही नाटकासाठी यापेक्षा समर्पक नाव त्यांना सुचलं नाही. विवाहबाह्य अशा स्त्री-पुरुष संबंधाला ‘अनैतिक संबंध’ म्हटलं जातं. नाटकाचा मुख्य विषय तोच होतं, तरीही मुळात नैतिक अनैतिक – या तशा व्यापक संकल्पना आहेत. जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही नितीतत्वं गुंडाळून ‘अनएथिकल’ वागणारी मंडळी असतातच.
‘अनैतिक’चा नायक उद्योगपती अविनाश रणदिवे-हा समाजाच्या दृष्टीनं अनैतिक संबंधात गुरफटतो हे खरं असलं, तरी तो अतिशय तत्वानं, नीतीनं आणि ताठ मानेनं जगणारा आहे. उद्योग व्यवसायातही पैशासाठी तडजोड करणारा नाही. स्वतःच्या जबाबदाऱ्या नाकारणारा नाही. दिलेलं वचन मोडलं गेलं याचं दुःख करणारा आहे आणि त्यासाठीची शिक्षा भोगायला तयार असणारा आहे.
त्याचा धर्मपत्नीकडे मात्र स्त्रीत्व आणि सौंदर्य या खेरीज काही म्हणजे काहीच नाही. शून्यातून विश्व उभं करणाऱ्या स्वतःच्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचं तिला काही कौतुक नाही की त्याच्या भव्य स्वप्नांचं सोयरसुतक नाही. स्वतः संशोधन करून देशात प्रथमच निर्माण होत असलेल्या आपल्या ‘टॉवरक्रेन’चं मॉडेल अविनाश तिला खास ‘प्रेझेंट’ म्हणून देतो, तेव्हा ती ‘खेळणं देऊन माझं समाधान करताय का?’ असं म्हणून ते नाकारते. साड्या आणि दागिन्यांखेरीज मोलाचं प्रेझेंट तिच्या लेखी नसतंच! अविनाश कमालीचा दुखावला जातो.
आणखी मौज म्हणजे, नवऱ्याला समजून घेण्याची काडीमात्र इच्छा नसणाऱ्या पत्नीचा-त्यानं मला पत्नी म्हणून वेळ दिला पाहिजे, माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे - असा आग्रह मात्र आहे. अर्थातच दोघांत ‘सुसंवाद’ होऊ शकत नाही. त्यातूनच ‘बायको काय एका क्षुल्लक गरजेसाठी असते का?’ अशा धारदार शब्दांत ती अविनाशला आणखी फटकारते. परिणामी शरीराच्या ‘क्षुल्लक’ गरजेकडे दुर्लक्ष करून अविनाश दिवसरात्र उद्योग व्यवसायात स्वतःला बुडवून घेतो.
या पार्श्वभूमीवर त्याला भेटते अश्विनी. एका ‘ट्रान्सपोर्ट’ कंपनीची संचालिका. नायक नायिकेचे पूर्णतः व्यावसायिक संवाद असलेली पहिली भेट-ही मराठी रंगभूमीवर प्रथमच साकारली होती. अविनाशनं दिलेली आव्हानात्मक कामगिरी अश्विनी स्वीकारते आणि पुरीही करून दाखविते. त्यानिमित्तानं ‘सेलेब्रेशन’साठी एकत्र आलेले अविनाश-अश्विनी तनमनानंही एक होतात – आणि ‘स्त्री-पुरुष संबंध’ हे सुद्धा अस्तित्वाचं एक अनोखं ‘सेलेब्रेशन’च असल्याचा अनुभव घेतात.
अविनाशची पत्नी आणि अश्विनीचा (तिच्या जीवनावर ऐय्याशी करणारा खुशालचेंडू) भाऊ, शेखर हे दोघे ‘अविनाश-अश्विनी’ला नैतिकतेच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतात-पण प्रेमासाठी सर्वस्व उधळून देण्याची तयारी दर्शवून अश्विनी त्या दोघांचे तथाकथित नैतिकतेचे निकष आणि डावपेच नेस्तनाबूत करते.
विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मध्ये अशाच अनैतिकतेचा आरोप असणाऱ्या बेणारे बाई उद्गारतात, ‘काय करु, मनानं पूजा करता करता देहाचा नैवेद्य कधी झाला कळलंच नाही’...या सुंदर संवादातील आशयच या नाटकात होता.
झलक (अनैतिक)
