स्वातंत्र्यवाद

‘का जगायचं’? हा प्रश्न फक्त माणसाला पडतो. म्हणूनच तो जगणं अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

माणसाचं जगणं म्हणजे फक्त ‘तगणं’ नसतं. सतत वाढणं, प्रगती करणं हेच माणसाचं खरं जगणं असतं.

स्वार्थ ही माणसाची स्वाभाविक प्रवृती असते आणि तीच त्याच्या प्रगतीची सर्वात प्रभावी प्रेरणा असते.

स्व-हित जपणं हा माणसाचा अधिकारच नव्हे, ते त्याचं कर्तव्य असतं. मात्र स्वतःचं हित म्हणजे इतरांचं अहित नव्हे.

इतरांसाठी निरपेक्षपणे काही करण्यात माणसाला जे समाधान मिळतं, तो त्याचा भावनिक स्वार्थ असतो...तर मोक्ष हा आध्यात्मिक स्वार्थ!

माणसाला पदोपदी विचार करावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो, निवड करावी लागते व त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते म्हणूनच त्याला ‘स्वातंत्र्य’ असावं लागतं. स्वातंत्र्य हेच सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.
स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवत, रुंदावत जाणं, हीच माणसाच्या जगण्यामागील प्रेरणा आहे.

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते – अनन्यसाधारण असते. हे वेगळेपण हेच व्यक्तीव्यक्तीतील समानतेचं सूत्र असतं.

स्वतंत्र विचार, कृती आणि निर्मिती ही ‘व्यक्ती’च करु शकते...समूह नव्हे.

व्यक्तीचं जीवन समाजाशिवाय अशक्य असलं तरी समाज हे साधन असतं...माध्यम असतं. उद्दिष्ट नव्हे.

समाज घडवणं, बिघडवणं, पुन्हा नव्यानं घडवणं, हे व्यक्तीच करीत असतात. समाजासाठी व्यक्ती नसतात – व्यक्तींसाठी समाज असतो.

व्यक्तिहिताचा बळी देऊन समाजहित साधणं ही एक भ्रामक, बिनबुडी कल्पना आहे. व्यक्तिहिताच्या संरक्षणातूनच अंतिमतः समाजहित साधलं जाऊ शकतं.

‘समाजाचे धारण करतो तो धर्म’ ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. असा आदर्श धर्म कुठलाही नाही, तरी प्रत्येक धर्म स्वतःला आदर्श मानतो.

खरा धर्म एकच असतो आणि तो प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. धर्म हा एक शोध असतो – तो ज्याचा त्यानं घ्यायचा असतो.

धर्म नव्हे, नीतिमूल्येच खरी सनातन असतात – ज्यांना ईश्वराचा नव्हे, विवेकाचा आधार असतो.

माणसाचा नैतिक, आध्यात्मिक विकास हा भौतिक विकासानंतरच होऊ शकतो. दरिद्री माणूस धार्मिक होणार कसा?

दारिद्र्याच्या दलदलीतच ‘महात्मे’ पैदा होतात.

गरिबी हटवायाची असेल तर दारिद्र्याचं समान वाटप नव्हे, श्रीमंती/समृद्धी निर्माण करायला हवी – जी फक्त उद्द्योजक, सृजनशील व्यक्तीच करु शकतात.

स्वातंत्र्याच्या पोटात योग्य समता मावते. समतेच्या पोटात मात्र स्वातंत्र्य मावत नाही.

दान माणसाला नादान बनवतं, दया त्याला शरमिंदं बनवते, सेवा त्याला दुबळं बनवते.

खरं सहकार्य – खरी देवाणघेवाण ही दोन ‘स्वतंत्र’ व्यक्तींमध्येच शक्य असते – अन्यथा ती लाचारी ठरते अथवा मेहेरबानी.

‘मी’ म्हणजे अहंकार – स्व म्हणजे अस्मिता. अस्मितेशिवाय ‘स्व’ला अस्तित्व असूच शकत नाही.

जगातल्या कुठल्याही धर्माला, संस्कृतीला, ईझमला... कुठल्याही ‘महात्म्या’ला - ‘मी आनंदात राहू नये’ हे सांगण्याचा अधिकार नाही. ‘माझा आनंद कशात आहे’ हे ठरविण्याचा अधिकार नाही.
आनंद हाच जीवनाचा आधार असेल तर तो मिळवणं, हेच माझं कर्तव्य ठरत नाही काय?

(या विचारांचा कथात्मक आविष्कार ‘दुरंगी’ या कादंबरीत तसेच ‘समूहवाद विरुद्द स्व’ हा संघर्ष कथानकाच्या माध्यमातून मांडणाऱ्या आगामी कादंबरीतही वाचता येईल.)