पोलीस दलात काहीतरी असामान्य कर्तब दाखवण्याची बजरंगाची तीव्र इच्छा असते. पण त्याला तशी संधी मिळत नसते. अखेर तो स्वतःच ती निर्माण करतो. ‘डेंजर डॉन’नं अपहरण केलेल्या दोन शाळकरी मुलांची, बजरंग मोठ्या धाडसानं सुटका करतो आणि त्याच्या कामगिरीचा महाराष्ट्रभर गवगवा होतो. प्रत्यक्षात ही मुलं स्वतः बजरंगानंच ‘डेंजर डॉन’च्या वेषात पळवलेली असतात. आणि नंतर हवालदाराच्या वेषात सोडवलेली असतात. अर्थात हे फक्त त्यालाच ठाऊक असतं. त्यामुळे त्याचे जंगी सत्कार सुरु असतात. त्याच्या बढतीची शिफारसही होते. तेवढ्यात थेट मुख्यमंत्र्याच्या मुलाचंच अपहरण होतं. ते खुद्द ‘डेंजर डॉन’नंच केलेलं असतं आणि भल्यामोठ्या खंडणीची मागणी केलेली असते. ही बातमी गुप्त ठेवली जाते. अपहरण झालेल्या मुलांना सोडवण्यात तरबेज असलेल्या हवालदार बजरंगला मुख्यमंत्री बोलावून घेतात आणि मुलाच्या सुटकेची कामगिरी सोपवतात. बजरंगाची अर्थातच पाचावर धारण बसते. पण त्याची ‘लबाडी’ ओळखलेला तरुण इन्स्पेक्टरच त्याच्या मदतीला येतो. दोघे एक कल्पक योजना लढवून मुलाची सुटका करतात आणि अर्थातच ‘डेंजर डॉन’ ला बेड्या ठोकतात.
पटकथा व पात्रयोजना यासंदर्भात भरपूर चर्चा झाल्यानंतर सामंतांनी कलाकारांना करारबद्ध केलं. बजरंगाच्या भूमिकेत अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या जोडीला प्रिया अरुण. याशिवाय अजिंक्य देव आणि निशिगंधा वाड. डेंजर डॉन च्या भूमिकेसाठी श्रीरंग गोडबोले होते. प्रिया अरुणच्या ग्रामीण बापाच्या भूमिकेतली सुधीर जोशी यांची निवड चुकीची होती. ग्रामीण वाटण्यासाठी त्यांना ‘काळं’ फासून पेश करण्यात आलं होतं.
प्र. ल. मयेकर आणि स्वतः गोर्ले यांनीच ‘सिच्युएशनबरहुकूम’ गीतलेखन केलं होतं.
