कुठल्याशा संस्थानच्या राजानं अखेरचा श्वास सोडलेला असतो... पण तो सोडण्यापूर्वी – लहानग्या युवराजाला घेऊन कित्येक वर्षांपूर्वी परागंदा झालेल्या आपल्या पाहिल्या राणीचा शोध घेऊन – युवराजला गादीवर बसवण्याचं त्यानं कारभाऱ्याकडून वचन घेतलेलं असतं. कारभारी,राणीचा व युवराजाचा शोध घेत असतात. अभिनयाबरोबर थापा मारण्यात तरबेज असलेले प्रशांत व विजय – अखेर थापा अंगाशी आल्यानं मुंबईतून हुसकावले गेलेले असतात. योगायोगानं ते या संस्थानात येतात आणि आपलं अभिनय-कौशल्य सिद्ध करण्यासाठी आपणच राणी व युवराज असल्याचा दावा करतात. प्रशांत ‘युवराज’ होतो आणि विजयला अर्थातच ‘राणी’ व्हावं लागतं. त्यानंतर जे नाट्य घडतं आणि अर्थात बिघडतंही, त्याची ही कथा.
कथा-पटकथा-संवाद याखेरीज गोर्ले यांनी ‘बंडलबाज’साठी ‘माझ्या हातात नऊ नऊ बांगड्या हो’ हे पॅरडिसॉँगही लिहीलं होतं. ‘राणी’च्या वेषातला विजय चव्हाण आणि अलका व किशोरीवर चित्रित झालेल्या त्या गाण्याला, प्रेक्षक थिएटर अक्षरशः डोक्यावर घेत असत.
‘टेलरमेड’ भूमिका असल्यानं प्रशांत व विजय दोघांनीही धमाल केली होती. शिवाय मोहन जोशी, रवींद्र बेर्डे, उषा नाडकर्णी, राहुल सोलापूरकर ही कसलेली मंडळीही होतीच. यावेळी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डेही होते.
‘बंडलबाज’ची भट्टी एकूणात चांगली जमली होती. पुन्हा एकदा प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद तर मिळालाच पण गोडबोले यांनी संवाद व गीते हिंदीत ‘डब’ करून ‘हम दो बंडलबाज’ या नावानं तो हिंदीतही सादर केला.
