चित्रपट - बाप रे बाप

प्रशांत आणि अश्विनी यांचं एकमेकांवर प्रेम असतं. अगदी खरंखुरं. पण प्रशांत बडया बापाचा बेटा असतो तर अश्विनीचा ‘बाप’ हवालदार असतो. साहजिकच बडया बापाचा दोघांच्या लग्नाला विरोध असतो. गंमत म्हणजे हवालदारालाही, बडया बापाचा लाडात वाढलेला नेभळट जावई नको असतो. त्याला हवा असतो निधड्या छातीचा जावई.
हरहुन्नरी मित्र अशोकच्या मदतीनं आयडिया लढवून प्रशांत निधड्या छातीचा असल्याचं हवालदारांना पटवलं जातं. ते लग्नाला राजी होतात. दोघांचं लग्न होतं. पण शेवटच्या घटका मोजतानाही प्रशांतचा बडा बाप – ‘प्रशांतनं अश्विनीला सोडलं तरच तो इस्टेटीचा वारसा होऊ शकेल – अन्यथा त्याला पैसाही देऊ नये’, असं मृत्युपत्र करतो.
आपल्यामुळे प्रशांत हक्काच्या इस्टेटीला मुकणार याचं अश्विनीला वाईट वाटतं. ती आणि अशोक पुन्हा ‘आयडिया’ लढवतात. अश्विनीनं प्रशांतला घटस्फोट द्यायचा. इस्टेट प्रशांतच्या नावावर झाली की पुन्हा लग्न करायचं. ती घटस्फोटासाठी वकिलाकडे जाते तर वकील त्यासाठी काहीतरी ठोस कारण दाखवावे लागेल असं सांगतात. मग पुन्हा एक आयडिया! प्रशांत व अशोकची मैत्रीण वर्षा यांचं लफडं असल्याचं दाखवायचं ठरतं. त्यासाठी त्यांना एकत्र आणून त्यांचे चोरून फोटो काढले जातात. पण नेमकी ही आयडीयाच अंगाशी येते. प्रशांत आणि वर्षा चक्क पळून जातात. हे भलतंच घडल्यानं अशोक, अश्विनी, हवालदार, प्रशांतचा बडा बाप... सगळ्याचंच धाबं दणाणतं. मग शोधाशोध आणि आपणच घातलेले घोळ निस्तरणं – असं भरगच्च कथानक होतं ‘बाप रे बाप’ या विनोदी चित्रपटाचं.
सगळीच पात्रं मनानं चांगली असतात. किंबहुना स्वतःपेक्षा दुसऱ्याचं भलं करू इच्छिणारी असतात. पण ते करण्यासाठी ती ज्या कल्पना लढवतात, त्यातूनच घोळ निर्माण होतो. मग तो निस्तरण्यासाठी नवी कल्पना... पुन्हा घोळ... शेवट मात्र गोड. अशी ही ‘निखळ मराठी फार्सिकल कॉमेडी’ होती.
प्रशांत दामले, अश्विनी भावे, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, सुधीर जोशी, विजू खोटे आणि चंदू पारखी.
गोर्लेंनी बोट दाखवलेले सर्व कलाकार घेतले गेलेला हा पहिला चित्रपट.
अशोक पत्की यांनी चित्रपटाला सुमधुर संगीत दिलं होतं. विशेष म्हणजे यातील गाणी कविता कृष्णमूर्ती व उत्तरा केळकर यांच्यासह प्रशांत दामले यांनीच गायली होती. ‘सजले स्वर हे, हसले मन हे,’ अशी अतिशय श्रवणीय गीतं होती. निर्मिती व इतर तांत्रिक बाजूही चोख होत्या. तशी एकूण ‘भट्टी’ व्यवस्थित जमली होती.