नाटयलेखन - बुलंद

‘संक्षिप्त मी’ या लेखात मी आयन रॅन्डकडून मिळालेल्या प्रेरणेबद्दल लिहिलं आहे. तिच्या कादंबऱ्यांतून जाणवणारं ‘द ट्रू ह्युमन स्पिरिट’ मराठीत ‘कॅप्चर’ करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे बुलंद. अर्थात ‘बुलंद’चा कथाविषय पूर्णतः या मातीतला. एका सेवाभावी संस्थेतला माझा  स्वतःचा अनुभव, मार्केटिंग क्षेत्राशी असलेलं नातं, ‘एनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट’ आणि ‘द राइट टू हॅपीनेस’... या आयन रॅन्डच्या संकल्पनांचा नाटयमय मेळ साधून मी बुलंद लिहिलं.
आता प्रश्न होता तो कलाकारांचा. यातली प्रत्येक भूमिका ताकदीची होती. रविंद्र मंकणी नायकाच्या भूमिकेसाठी होतेच पण नायिकेची भूमिका एक आव्हान म्हणून रिमा लागू यांनी स्वीकारली. मग नीना कुलकर्णी, मोहन जोशी, सुहासिनी देशपांडे आणि आनंद अभ्यंकर – अशी प्रत्येक भूमिकेसाठी ‘परफेक्ट अशी स्टारकास्ट ठरली.
‘वेगळा विषय... वेगळी नायिका... विक्री व्यवसायाची नाट्याला दिलेली डूब आणि त्यातही मानवी भावना-विकाराचं दर्शन. जाहिरात मोहिमेची सुरेख झलक प्रथमच नाटकातील पडद्यावर दिसते. नाट्यसंघर्ष खुलवण्यासाठी तिचा चातुर्यांनं वापर केला आहे. मार्केटिंग हा विषय मराठी रंगभूमीवर प्रथमच आला आहे. व्यावसायिक स्पर्धेची अद्भुतता प्रकट करणाऱ्या या नाटकातील पात्रांचं व्यक्तिमत्व ‘बुलंद’ आहे. लेखनदृष्ट्या दोन्ही अंक सरस उतरले असले तरी दुसरा अंक कमालीचा सशक्त आणि खणखणीत झाला आहे.

ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी ‘बुलंद’ मधील डॉलीची भूमिका आणि रिमाचा अभिनय याविषयी जे लिहिलं होतं, ते उदधृत करायलाच हवं. त्यांनी म्हटलं होतं “मराठी रंगभूमीला सर्वथैव अपरिचित अशी भूमिका बाह्यतः उच्छृंखल अहंकारी स्त्रीची आहे, तशीच ती स्वतःच्या शब्दांशी इमान राखणाऱ्या एका मनस्वी स्त्रीचीही आहे. या अफलातून अशा भूमिकेचं आव्हान पेलण्यासाठी रिमानं केलेली पूर्वतयारी स्पष्ट दिसते. येथे तिने पूर्वप्राप्त व ख्यातकीर्त अशा भूमिकांच्या सर्व खाणाखुणा पार पुसून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या व्यक्तित्वाशी विसंगत अशी एक मोठी सामर्थ्यशाली स्वच्छंद भूमिका तिनं मोठया ताकदीनं साकारली आहे. केवळ रिमा लागूच्या या अनोख्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी ‘बुलंद’ हे नाटक एकवार आवर्जून बघायला हवे. आणि माझी खात्री आहे की ते एकदा पाहिल्यावर पुन्हा बघण्याचा मोह त्यांना अनावर झाल्याशिवाय राहणार नाही”. 
झलक (बुलंद)

निर्मला  :
राजन, जग चालतं ते त्यागावर, स्वार्थावर नव्हे. नानासाहेबांनी त्याग केला म्हणून तर एक संस्था उभी राहिली... शाळा उभी राहिली.
राजन   :
आणि ती उभीच राहावी म्हणून आता तुम्ही त्याग करीत आहात! मला एक सांगा मॅडम, तुमच्यासाठी कुणी त्याग केलाय?
निर्मला  :
मला त्याची गरज नव्हती!
राजन   :
पण गरज पडली तर तुम्ही म्हणाल कुणाला-तुमच्यासाठी त्यानं त्याग करावा असं?
निर्मला  :
नाही.
राजन   :
का नाही?
निर्मला  :
मी स्वतःकडे पाहायला समर्थ आहे.
राजन   :
मग इतर समर्थ नाहीत हे कुणी सांगितलं तुम्हाला? तेही समर्थ होऊ शकतात. व्हायला हवेत. पण मग तुम्ही सेवा करणार कुणाची... दया दाखवणार कुणाला? तुम्हीच त्यांना दुबळं लाचार बनवताय. एक लक्षात ठेवा मॅडम... दान माणसाला नादान बनवतं... तुमची दया त्याला शरमिंद बनवते... दुबळं बनवते.
निर्मला  :
ही दया नव्हे राजन... हे प्रेम आहे. तुला काय म्हणायचंय, माझ्या शाळेतल्या मुलांवरही मी प्रेम करायचं नाही?
राजन   :
(हसत) प्रेम केलं पाहिजे, ही सक्ती झाली मॅडम. करायचं ठरवून केलं जातं त्याला प्रेम म्हणत नाहीत. देशावर प्रेम करा... देवाची भक्ती करा, हे खूप उदात्त विचार वाटतात. पण मॅडम, प्रेमाची काय किंवा भक्तीची काय-सक्ती नाही करता येत!