दत्ता गोर्ले (शब्दांकन- शिवराज गोर्ले )
दादांना इंडस्ट्रीवाले ‘गोर्ले अण्णा’ म्हणतात. राजा परांजपे म्हणजे गोर्ले अण्णांचं श्रद्धास्थान आणि गोर्ले अण्णा म्हणजे राजाभाऊंचे कॅमेरामन. सुरुवातीचे तीन-चार चित्रपट सोडले तर पुढच्या.. राजाभाऊंच्या सर्वच चित्रपटाचं छायाचित्रण दादांनीच केलं. उणीपुरी पन्नास वर्षे काढली आहेत दादांनी मराठी चित्रपटसृष्टीत! अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, राजा ठाकूर, राजदत्त... अशा सर्वच मातब्बर दिग्दर्शकांचे चित्रपटही त्यांनी केले आहेत. दादांचं अर्धशतकी ‘फिल्मी आयुष्य’ आणि त्या काळातले जवळजवळ पन्नास चित्रपट... त्या कालखंडातला हा ‘फ्लॅशबॅक’ आहे.
लिहिलं सगळं दादांनीच आहे. गोर्लेंनी ते सजवलं आहे. मधल्या जागा तेवढया भरल्या आहेत. चित्रपटात संगीत दिग्दर्शक गाण्याला चाल लावतो आणि ‘कंपोझर’ जो असतो, तो वाद्यांच्या सुरावटी जोडून ती चाल आकर्षक करीत असतो. चाल बदलीत मात्र नाही. तसंच काहीसं काम गोर्लेंनी या पुस्तकाबाबत केलं आहे. पुस्तकाची ‘चाल’ दादांनीच ठरवली आहे, गोर्लेंनी फक्त शब्द ‘कंपोझ’ केले आहेत.
