चित्रपट - चिमणी पाखरं

‘चाटे क्लासेस’चे संचालक श्री मच्छिंद्र चाटे यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. त्यांचा पहिला चित्रपट ‘बिनधास्त’ हा चांगलाच गाजला होता. पुढच्या चित्रपटासाठी त्यांनी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथेचे हक्कही मिळवले होते. एक विधवा स्त्री पतीच्या पश्चात आपल्या चार चिमण्या पाखरांचा सांभाळ करीत असतानाच तिला कॅन्सर असल्याचं निदान होतं. स्वतःचा मृत्यू समोर दिसत असतानाच ती आपल्या पश्चात आपल्या ‘पिलां’ची सोय लावण्यासाठी जो जीवाचा आटापिटा करते, त्याची ही कथा.
ही एक ह्रद्यस्पर्शीच नव्हे, तर अक्षरशः काळजाला भिडणारी शोकांतिका आहे.
‘चिमणी पाखरं’च्या नायिकेच्या भूमिकेसाठी चाटे व कोठारे यांनी थेट ‘पद्मिनी कोल्हापुरे’ या अभिनेत्रीला पाचारण केलं, तेव्हा पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी चकित झाली. ‘आर के बॅनर’च्या या अभिनेत्रीनं या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करायचं ठरवलं. तिच्या तोडीस तोड अभिनयासाठी सचिन खेडेकर या तगड्या कलाकाराची निवड झाली. त्या नंतर चित्रपटात महत्वाचे होते ते बाल कलाकार. त्यांचीही निवड झाली. आणि त्याचवेळी एक महत्वाचा निर्णय घेतला गेला. चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये करण्याचा. अर्थात केवळ डबिंग नव्हे तर हिंदीतील संपूर्ण संवाद नव्यानं लिहून – प्रथम मराठी व नंतर लगेच हिंदीतील शॉट्स असं दुहेरी चित्रीकरण करायचं ठरवलं. महेशजींची हिंदी आवृत्तीच्या संवादाची जबाबदारीही गोर्लेंकडे आली.
चित्रपटातील गीते सिद्धहस्त गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. तर संगीत अच्युत ठाकूर यांचं होतं. ‘माया मंदिर हालले-‘ हे थीमसाँगं तर कमालीचं भावस्पर्शी उतरलं होतं. ‘कॉमिक रिलीफ’ साठी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण हेही होतेच.
चित्रपटाचं रसायन अगदी खास जमलं होतं.
मुंबईमध्ये तर चित्रपटानं सुवर्णमहोत्सव साजरा केलाच, पण अनेक सेंटर्सवर ‘माहेरच्या साडी’चे विक्रमही मोडले.