चित्रपट - धुमाकूळ

अत्यंत सुस्वभावी आणि प्रामाणिक असलेले दोन तरुण, त्यांच्या भाबडेपणामुळेच नाडले जातात... स्वतः लबाड असलेली मंडळीच त्यांच्यावर खोटे आळ घेऊन, त्यांना कोंडीत पकडतात. त्यांचा उपमर्द करतात. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते दोघे खंडणीसम्राट ‘लालगेंड्या’चं नाव वापरून एकेकाला ‘धडा’ शिकवू लागतात-तोच ओरीजिनल लाल गेंडा उदभवतो आणि एकीकडे लाल गेंडा तर दुसरीकडे पोलीस, अशी दुहेरी कचाट्यात ते सापडतात. त्यांची उडालेली भंबेरी आणि त्यातून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या युक्त्या-प्रयुक्त्यांची कहाणी म्हणजे ‘धुमाकूळ.’
प्रशांत दामले आणि विजय चव्हाण यांनी त्यांच्या भूमिका नेहमीच्याच सफाईनं खुलवल्या होत्या, विनोदी चित्रपटांच्या प्रेक्षकांनी ‘धुमाकूळ’ला चांगला प्रतिसाद दिला. पुण्यातील थिएटरवर पहिला ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड लागला तेव्हा त्याला हार घालताना निर्मात्यानं फक्त हसण्यातूनच व्यक्त केलेलं समाधान, गोर्ले आजही विसरले  नाहीत.