उद्योजकता हा एक गोर्लेंच्या जिव्हाळ्याचा विषय. शून्यातून विश्व उभं करणारा उद्योजक हा गोर्लेना खऱ्या अर्थानं ‘नायक’ वाटतो. या उद्योजकाला नायक बनविणारी कादंबरी गोर्लेंनी लिहिली नसती तरच नवल. कुठलाही उद्योग जमिनीतून उगवत नसतो. तो उभारण्याचं स्वप्न कुणा उद्योजकानं पाहिलेलं असतं... भविष्यात डोकावून, जीवन अधिक संपन्न, समृद्ध करू शकेल असं एखादं उत्पादन, अशी एखादी सेवा तो शोधून काढतो. त्याच्या निर्मितीसाठी प्रसंगी स्वतःचं सर्वस्व (क्वचित पत्नीच्या अंगावरचे दागिनेही) पणाला लावून तो गुंतवणूक करतो. जोखीम पत्करतो नवं तंत्रज्ञान मिळवतो. त्यातल्या अडचणींवर मात करतो. पण एवढं पुरेसं नसतं. त्याला ग्राहकही मिळवायचे असतात. मागणी निर्माण करायची असते. स्पर्धेतही स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं.
हे सारं साधून त्याचा उद्योग उभा राहतो. बहरतो. कामगारांची संख्याही वाढत जाते. प्रारंभी रोजगार मिळाला म्हणून कामगार खुश असतात. पण जसजसा उद्योग वाढतो, तशा त्यांच्या अपेक्षाही वाढतात. त्यांना आता उद्योगाच्या नफ्यात पुरेसा वाटा हवा असतो. मग युनियन बनतात. संघर्ष सुरु होतो. वाटाघाटी फिस्कटल्या की संप पुकारले जातात. ‘हमसे जो टकराएगा’च्या घोषणा दिल्या जातात. समझोता झाला नाही तर मग उद्योगांच्या दारांवर बावटे झळकू लागतात. क्वचित टाळेबंदी पर्यंत प्रकरण जातं. एक चालता उद्योग बंद पडतो. ठप्प होतो.
शंतनुराव किर्लोस्कर आणि एस एम जोशी या दोन मान्यवरांवर आधारित व्यक्तिरेखा उभ्या करून गोर्लेंनी हा दुरंगी सामना उभा केला आहे. वैचारिकता आणि रंजकता यांचा अभूतपूर्व मेळ साधून.
ज्या काळात जगभरच्या विचारवंताना आणि नेत्यांना साम्यवाद, समाजावादानं पछाडलेलं होतं , त्या काळातही 'समाजवादाचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही ' असं स्पष्ट भाकित करणारी पहिली स्त्री होती आयन रॅन्ड. तिचं हे भाकित अखेर खरं ठरलं. मात्र आज जगभर समाजवादाची पीछेहाट झालेली असली; तरी भारतीय मानसिकतेवरची ‘समाजवादा’ची मोहिनी अद्याप ओसरलेली नाही.
म्हणूनच ‘आपल्या श्रीमंती निर्माण करायची आहे कि दारिद्र्याचं वाटप करायचं आहे?’ असा परखड सवाल करणारी ही कादंबरी आजही महत्वाची ठरते. उद्योगविश्वानं कादंबरीचं खुल्या दिलानं स्वागत केलं.
प्रिय श्री. शिवराज गोर्ले
आपल्या कादंबरीने दृष्टीपार वाळवंटात हिरवळ दिसल्यासारखे झाले. ‘खुज्या व्यक्तींचा देश मोठा होऊ शकत नाही’ अशी अवतरणे मराठी कादंबरीत वाचून पूर्वेच्या क्षितिजावर अपेक्षित बदल दिसू लागल्याचे समाधान वाटले.
‘स्वार्थ म्हणजे पाप-त्याग करतो तो मोठा-अधिक कष्ट करतो तो श्रेष्ठ’, या पीडावादी संस्कृतीतून मराठी वाचकांना बाहेर काढण्याची सुरवात तुम्ही केली आहे. अगदी मनःपूर्वक अभिनंदन.
खा. शरद जोशी.
शेतकरी संघटना
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या जुन्या विचारसरणीच्या बाहेर, आजच्या पिढीला आणण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ असलेल्या आणि ‘कोर्पोरेट क्षेत्रा’चा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या लेखकाने धडाडीचे उद्योजक व अरेरावी करणाऱ्या कामगार संघटना-यांच्यातील संघर्षाचे सुरेख चित्रण केले आहे. श्रीमंत होणे हे पाप आहे, हा विचार लेखकाने खोडून काढला आहे.
माधव गडकरी.
ज्येष्ठ पत्रकार
ही कादंबरी मला अलीकडच्या साहित्यातील आवडलेली एक महत्वाची कादंबरी आहे. दोन विचारधारांतील संघर्ष व स्वार्थाचे तत्वज्ञान अतिशय प्रभावी रीतीने लेखनाने मांडले आहे. उत्तम संवादशैली, प्रभावी प्रसंग निर्मिती आणि तपशिलांचा संयत वापर यांच्या योगाने ही कादंबरी वाचकाला हातात घेतल्यापासून शेवटाला जाईपर्यंत बांधून घालते. वाचक जेव्हा कादंबरी वाचून संपवतो तेव्हा तो त्यातील विचारांनी भारावून जातो आणि दीर्घकाळ त्याच्यावर स्वतः विचार करीत राहतो. वाचकाच्या विचारविश्वात खळबळ माजविण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे, म्हणूनच ती महत्वाची.
सुरेशचंद्र पाध्ये
ज्येष्ठ पत्रकार
