सहज बोलता बोलताही एखाद्या ‘सुपरडुपरहिट’ नाटकाचा जन्म होऊ शकतो! गोर्ले नोकरी सोडून पूर्णवेळ नाट्यक्षेत्रात उतरले होते. त्यांचं ‘टिंगलंम्’ लवकरचं रंगमंचावर येणार होतं. त्यामुळे पुण्यातल्या रंगकर्मीमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अनंत कान्हो, रविंद्र मंकणी, राहुल सोलापूरकर, आनंद अभ्यंकर, नंदिनी जोग... आणि विजय जोशी, भालचंद्र पानसे...अशी मंडळी रोज संध्याकाळी गंधर्वच्या ‘कॅफेटेरिया’त जमू लागली होती. अशाच एकदा गप्पा चालू असताना रविंद्र मंकणी यांनी म्हटलं, “गोर्ले-तुम्ही आता सस्पेन्स कॉमेडी लिहा!” गोर्लेंनी चटकन प्रश्न केला, “सस्पेन्स कॉमेडी म्हणजे?” मंकणींनी ‘हॅन्डस अप्’चं उदाहरण दिलं. भक्ती बर्वे, सदाशिव अमरापूर यांचं ते नाटक प्रचंड गाजलं होतं. पण गोर्लेंनी ‘हॅन्डस अप्’ पाहिलं नव्हतं. तरीही कल्पना यावी, म्हणून ‘हॅन्डस अप्’चं पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचे हक्क मूळ गुजराथी लेखकाकडे असल्याने पुस्तकही निघालेलं नव्हतं. गोर्लेंना कल्पना आवडली होती. आणि शाळेपासूनच ‘कल्पनाविस्तारा’ची कला अवगतही होती. पुढच्या पंधरा दिवसांतच गोर्लेंनी ‘सस्पेन्स कॉमेडी’ लिहून काढली. सगळ्यांनाच ती आवडली, तसं विजय जोशी यांनी ते नाटक पुण्यातून काढायचं ठरवलं. एक धाडसच होतं ते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर “नाटकाचा खर्च नव्वद हजारापर्यंत जाणार होता. पण गोर्लेंना साइनिंग अमाऊंटचा चेक दिला तेव्हा सही करताना माझे हात थरथरत होते. कारण तेव्हा माझ्या खिशात फक्त नव्वद रुपये होते!” नाटकातली मध्यवर्ती इन्स्पेक्टरची भूमिका यशवंत दत्त यांनी करावी असंच सगळ्यांचं मत होतं. यशवंत दत्त यांना नाटक आणि भूमिका आवडलीही होती. किंबहुना ‘गोलमाल’ नावही त्यांनीच सुचवलं होतं. मात्र ‘डेट्स’च्या प्रॉब्लेममुळे ते काम करु शकले नाहीत.
‘अहो-आजकाल’ ‘हसतखेळत अंकगणित’ असतं, तर हसत खेळत पंचनामा का करु नये?’ असं म्हणत ‘गोलमाल’ मधील इन्स्पेक्टर नखाते (न खाते!) नाटकाचा ताबा घेतात. अधूनमधून ‘कसचं...कसचं’ म्हणून लाजतातही. कुलदीप पवार यांच्या सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, भूमिकांना छेद देणारी ही विनोदी भूमिका पाहून प्रेक्षक चकित होत. पण प्रत्येक प्रवेशाच्या शेवटी ‘कुणी केला खून?’ या कुलदीप पवारांच्या रांगडया आणि धारदार सवालानं स्टेजवरील पात्रांचा थरकापही उडत असे. त्यामुळेच भरपूर ‘कॉमेडी’ असतानाही नाटकातल्या ‘सस्पेन्स’चा ताणही कायम रहात असे.
सविता प्रभुणे हेही ‘सरप्राइज पॅकेज’ होतं. विख्यात अभिनेत्री आणि तिची तमासगीर जुळी बहिण या दुहेरी भूमिका सवितानं साकारल्या होत्या. एरव्ही सोज्वळ भूमिकात दिसणाऱ्या सवितानं उभी केलेली ‘शेवटी मीबी लफड्यातलीच की’ म्हणणारी मंदा चव्हाण, प्रेक्षकांची खणखणीत दाद मिळवत असे.
कुलदीप, सविता हे सिनेस्टार होते. त्यांच्या प्रेक्षकवर्गही वेगवेगळा होता. ‘गोलमाल’च्या निमित्तानं हे प्रेक्षक एकत्र आले आणि रहस्य-हास्यच्या देखण्या मिलाफानं रंगून गेले. महाराष्ट्रभर ‘गोलमाल’चे दणक्यात प्रयोग होऊ लागले. टिंगलम् चे दोनशे प्रयोग होईपर्यंत ‘गोलमाल’चे शंभर प्रयोग झाले. पुढेही ही घोडदौड चालूच राहिली. ‘टिंगलम्’चे आजतागायत १२०० प्रयोग झाले तर गोलमालचे सुमारे ७००! ‘गोलमाल’ नंतर अविनाश खर्शीकर व किशोर अंबिये या कलाकारांसहही रंगभूमीवर आले. त्याची व्हिडिओ कॅसेटही उपलब्ध आहे.
झलक (गोलमाल)
