नाटयलेखन - कुर्यात पुन्हा टिंगलम


टिंगलम् ची पात्रं कमालीची लोकप्रिय झली होती – त्यांना ‘पुढे चाल’ देणं शक्य होतं. शिवाय ‘लग्न’ हा विषयही पुन्हा येऊ शकत होता. ‘कुर्यात सदा’ मध्ये अतुलचं लग्न जुळलं होतं... पण त्याची बहिण ‘माणिक’ लग्नाची होतीच. शिवाय ती स्त्री-मुक्तीवाल्या राणेबाईंची शिष्या असल्यामुळं तिचं लग्न... हा ‘हास्यस्फोटक’ विषय ठरू शकत होता. गोर्लेंनी दुसरा भाग लिहून पूर्णही केला. पहिल्या भागातील लंडननिवासी बापट दंपतीला परत लंडनला पाठवलं. या भागात राणेबाईंचं पदार्पण (म्हणजे प्रेक्षकांना दर्शन) झालं... राणेबाईंच्या भाच्याशी-राजाशीच माणिकचं लग्न जुळवायचं ठरलं... त्यात नेहमीप्रमाणे काही खुसपटं निघालीच. पहिल्या भागात गोर्लेनी ‘हुंडा मागाल तर धोंडा खाल’ हा संदेश दिला होता. या भागात आंतरजातीय विवाहाचा घाट घातला. अर्थात तोही खास त्यांच्या शैलीत. यात ‘गब्बर’च्या तोंडून – ‘जिसने किसिकी जात निकाली – गब्बरने उसकी खाल निकाली’ असा दम भरण्यात आला.
कुर्यात सदा टिंगलम् आणि कुर्यात पुन्हा टिंगलमचं एकत्र पुस्तक कॉन्टिनेन्टलनं प्रकाशित केलं... त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेरची हौशी मराठी मंडळी गणेशोत्सवात,स्नेहसंमेलनात आजही दोन्ही नाटकांचे प्रयोग करीत असतात. किंबहुना हौशी कलाकारांची ही दोन्ही नाटकं अक्षरशः लाडकी झाली आहेत. ‘स्वरूपकुमारां’सह ‘पुन्हा टिंगलम्’ ची ‘व्हिडिओ कॅसेटही उपलब्ध आहे. मौज म्हणजे पक्त महाराष्ट्रातच नव्हे तर न्यूयॉर्क, लंडनच्या काही बुकस्टोअर्स आणि लायब्ररीजमध्ये ‘टिंगलम्’ च्या कॅसेटसना आजही मागणी असते. टिंगलमचे व्यावसायिक प्रयोग थांबले असेल तरी हौशी प्रयोग होतच राहतील. टिंगलमच्या कॅसेटसही मराठी घरांतून पाहिल्या जातील. मराठी रसिकांच्या भावविश्वात ‘टिंगलम्’ हे नाव नेहमीच सुखद, मिष्कील स्मृती जागवत राहील.
झलक (कुर्यात पुन्हा टिंगलम्)

सुनिता :
अहो ऐकलं का... माणिकनं पसंत केलेला तो मुलगा – आपल्यातला नाहीय... माळ्याचा की मराठ्याचा आहे म्हणे!
प्रभाकर :
असू देत हो, काय फरक पडतो त्यानं!
सुनिता :
(वैतागून) तुम्हाला नाही हो फरक पडणार! तुम्ही लगेच आत जाऊन पडाल पण आम्हाला बाहेर पडावं लागतं ना! आणि अहो त्यांच्या खाण्यापिण्याचं काय – त्यांच्यात मटन, मच्छी सगळं घरातच करतात म्हणे. बाई, बाई, बाई – उदया माझ्या माणकीला मासे साफ करायला सांगितले तर... नुसत्या कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा येतोय.
प्रभाकर :
(स्वतःशीच) काटा येतोय? थांब तुझा काटाच काढतो!
सुनिता :
काय म्हणालात?
प्रभाकर :
अहो मासे मटन काय घेऊन बसलात ? हल्ली सर्रास सगळे खातात. आपल्यासारख्या ब्राम्हणांनीच तर मटन महाग केलंय.
सुनिता :
काहीतरी बोलू नका. सगळेच काही खात नाहीत ‘तसलं!’
प्रभाकर :
सगळेच खातात ‘तसलं’! अहो, आमच्या ऑफिसमध्ये मारुती कांबळेच्या डब्यात मटन आलं की सगळी भटं कशी तुटून पडतात!
सुनिता :
ईSS
प्रभाकर :
ई काय, मी तर पहिला!
सुनिता :
(दचकून) काय? म्हणजे तुम्ही पण खाता की काय तसलं... अरे देवा देवा... काय लाज, लज्जा शरम? (एकदम आठवून) अगंबाई, अहो काल तर खाऊन आला नव्हतात ना?
प्रभाकर :
का बुवा?
सुनिता :
का बुवा काय – अहो काल माझा उपास होता!
प्रभाकर :
म्हणून काय झालं? तुमच्या उपासाचा आणि माझ्या मटन खाण्याचा संबंध येतोच कुठे?
सुनिता :
अहो असं काय करता! (ओशाळून) म्हणजे काल त्याच तोंडानं तुम्ही माझा... (ओठांवर हात ठेवीत) बाई बाई बाई.
प्रभाकर :
(बावचळून) तुमचा काय?
सुनिता :
(लटक्या रागानं) त्याच तोंडानं तुम्ही माझा...
प्रभाकर :
(आता खुलून) अहो, तुमचा काय?
सुनिता :
माझा उपासाचा चिवडा खाल्लात ना!
प्रभाकर :
हात्तीच्या एवढंच होय! मला वाटलं मममम...
सुनिता :
गप्प बसा!