नाटयलेखन - कुर्यात् सदा टिंगलम्

कुर्यात् सदा टिंगलम् या नाटकानं शिवराज गोर्ले यांना ‘नाटककार’ बनवलं, उभ्या (आणि आडव्या) महाराष्ट्राला तब्बल २०, २२ वर्षं हसवलं आणि तमाम समीक्षकांना  सपशेल चकवलं!
‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यात ‘गुदरणारा’ एक महत्त्वाचा प्रसंग असतो. पण ‘लग्न’ जितकं महत्त्वाचं तितकंच ‘लग्न ठरवणं’ आणि ते ‘पार पडणं’ या साऱ्यांत गमतीजमतींची भरपूर शक्यता असते. लग्नाळू तरुण तरुणींची हुरहूर...त्यांची मानसिक धांदल आणि अजूनही होत असणारी वधूपक्ष – वरपक्ष यांच्यातील मजेशीर रस्सीखेच, हा ‘टिंगलम्’चा विषय. त्यात देशस्थ विरुद्द कोकणस्थ, असा मामला असल्यानं तो अधिकच मजेशीर झाला आहे.

आम्ही पराभूत झालो!
‘कुर्यात् सदा टिंगलम्’ हे आम्ही पहिल्याच प्रयोगाला पाहिले. वाटले, हे नाटक जेमतेम पाच-दहा प्रयोगांपर्यंत पोहचेल. पण आमचा अंदाज सपशेल चुकवून ते दोनशे प्रयोगांपुढे गेले आहे. सतत गर्दी खेचत हाउसफुल्ल होत आहे. जे आम्हास समजले नाही ते या नाटकातून प्रेक्षकांना मिळत असले पाहिजे. सर्वांत महत्वाचे म्हणजे मराठी फार्सच्या प्रेक्षकाला ‘टिंगलम्’ आवडले आहे. या नाटकाने आम्हास रीतसर पराभूत केले. अर्थात्‌ या पराभवातही एक वेगळाच आनंद आम्ही अनुभवत आहोत.
- ज्येष्ठ समीक्षक मंगेश तेंडुलकर

‘टिंगलम्’ ते ‘मंगलम्’
‘टिंगलम्’चा प्रयोग संपला आणि एक नवं कोरं जोडपं ‘बुकिंग’वर आलं. त्यांनी गोर्लेंची चौकशी केली. गोर्ले त्यावेळी नेहमीप्रमाणे गंधर्वच्या कट्ट्यावर गप्पा टाकत बसले होते. हे दोघे गोर्लेंजवळ आले आणि म्हणाले, “सर-आम्हाला तुमच्या पाया पडायचं आहे.” “का बुवा?” गोर्लेंनी प्रश्न केला. त्यावर त्यातल्या तरुणीनं म्हटलं, “सर- ‘टिंगलम्’ अगोदरच पाहिलं होतं. पण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी याला म्हटलं – आपल्या घरच्या सगळ्यांना टिंगलम् दाखवू या. आमच्या दोन्ही घरच्यांनी टिंगलम् एकत्र पाहिलं. त्यामुळे नंतर देणी-घेणी, रुसवे फुगवे असं काही झालंच नाही. उलट तुमचे विनोद आठवीत, सगळं कार्य कसं हसत खेळत पार पडलं. केवळ तुमच्या नाटकामुळे हे होऊ शकलं”, असं म्हणत, दोघांनी वाकून नमस्कार केला.
गोर्ले सांगतात त्याप्रमाणे, ‘टिंगलम् वरची सगळी कडवट टीका त्या एक क्षणात विरघळून गेली!’

‘टिंगलम्’ त्यांना कळले हो!
माननीय श्री. शिवराज गोर्ले.
सप्रेम नमस्कार,
१९८८ च्या भारत भेटीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आपले ‘कुर्यात सदा टिंगलम्’ पाहिले. नाटकाने मी अक्षरशः भारावून गेलो. नाटयाचार्य खाडिलकर, गडकरी यांच्या तोडीचे किंबहुना विनोदात सरस वाटले. मात्र हे नाटक केवळ विनोदी नव्हे – त्यात हुंडा यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर हसत खेळत शैलीने सुंदर भाष्य केले आहे. मनोरंजनाबरोबर जीवनातील गंभीर प्रश्नही नाटकात मांडणारे तुमच्यासारखे नाटककार विरळाच!
माधव गोगावले
फोर्ट वेन, इंडियाना (अमेरिका)
(एक प्रश्न – जे अमेरिकेच्या गोगावलेंना समजलं ते आमच्या पुण्या-मुंबईच्या समीक्षकांना का उमजलं नसावं?)