प्रेरक साहित्य - मजेत जगावं कसं ?

इंग्रजीत यश... आनंद... यावर शेकडो पुस्तकं उपलब्ध आहेत .
हाऊ टू गेट व्हॉट यू वॉन्ट, थिंक अँन्ड ग्रो रिच, द मॅजिक ऑफ बिग थिंकिंग ही सगळीच पुस्तकं कमालीची इंटरेस्टिंग होती. त्यात खूप काही नवं होत... उपयुक्त होतं... प्रेरक होतं. हे असं प्रेरक साहित्य अक्षरशः उदंड होतं. त्यातलं शक्य तितकं वाचून काढायचं, या निर्धारानं गोर्ले दोन-अडीच वर्षं, त्यात रमून गेले. वाचलं, त्यातून जे मोलाचं वाटलं, ते वेचत राहिले, इतक्या वाचनानंतर काही अत्यंत प्रभावी सूत्र गवसली. ती सूत्रं, खास स्वतःच्या शैलीत, अवतीभवतीच्या उदाहरणांसह त्यांनी  एकत्र गुंफली आणि त्यातूनच आकाराला आलं – मजेत जगावं कसं?
पुस्तकाची पहिली २००० प्रतींची आवृत्ती आवघ्या ९ दिवसांत संपली. हा मराठी प्रकाशनविश्वातला विक्रम होता.
गेल्या सहा वर्षातं ‘मजेत’च्या २५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.
पण ‘मजेत’चं अभूतपूर्व यश हे फक्त आकड्यांमध्ये बंदिस्त नाहीय. ‘मजेत-’नं हजारोंची आयुष्यं बदलली आहेत. असंख्यांना उमेद, दिलासा, प्रेरणा दिली आहे. अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली आहे. आज कित्येक डॉक्टर्सही ‘मजेत’ वाचण्याची शिफारस करतात. ‘मजेत’नं गेल्या काही वर्षात अनेक वाचकांना अगदी आत्महत्येच्या विचारांपासूनही परावृत्त केलं आहे.
‘महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदे’नं ‘मजेत जागावं कसं?’ पुस्तकासाठी ‘गोयंका पुरस्कार’ देऊन गोर्लेंचा गौरवही केला आहे.
मजेत जगणं म्हणजे काय?
मजेत जगणं म्हणजे मनाप्रमाणे, मनाजोगतं,
मनस्वी आणि मनसोक्त जगणं. भरभरून जगणं.
स्वतःचा पिंड ओळखून, सहज स्वाभाविकपणे जगणं
आपली ‘पट्टी’ नेमकी ओळखून तिच्यातच सुरेल गाणं.

मजेत जगणं म्हणजे आनंदात जगणं.
आनंद अंतरंगातच असतो आपल्या, याचं भान ठेवणं.
आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण उत्कटतेनं, समरसून जगत-
त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जागतं ठेवणं.

मजेत जगणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं.
स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, गरजा यांच्याशी प्रामाणिक असणं.
शरीराच्या, मनाच्या गरजा असतात, तशा ह्रद्याच्या, 
अत्म्याच्याही असतात. बौद्धिक असतात, आर्थिक असतात,
कौटुंबिक आणि सामाजिक असतात.
या सर्व गरजांचा सतत समतोल साधत जगणं.
आयुष्यात अनेक भूमिका येतात आपल्या वाटयाला;
त्या सर्वच भूमिका समरसून जगणं, यशस्वी करणं.
फक्त यशस्वी होणं नव्हे, तर यशस्वी जगणं.
आंतरिक यशाबरोबरच भौतिक यशही मिळवणं.
तत्वांशी तडजोड न करता, मूल्यांशी फारकत न घेता
शांती व समाधान न गमवता... आयुष्यात हवं ते मिळवणं.
त्यासाठी प्रयत्नशील असणं.
स्वतःच्या क्षमता ओळखणं, त्यांचा पुरेपूर वापर करणं.
सतत क्षमता वाढवीत राहणं. सतत शिकत राहणं

स्वतःशीच स्पर्धा करीत, स्वतःतलं सर्वोत्तम गाठणं.. ते प्रकट करणं.
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, एकमेव... अद्वितीय असते याचं भान ठेवत,
प्रेरणा घेत, मात्र अनुकरण टाळत.. आपल्या शैलीनं जगणं.

मजेत जगणं म्हणजे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणं.
आयुष्याचा कोरा ‘कॅनव्हास’ असतो समोर,
त्यात मनाजोगते रंग भरणं.. अर्थ भरणं.
स्वप्नं पाहणं.. ती प्रत्यक्षात उतरवणं.
जग विशाल असतं.. जीवन अफाट असतं.
ते जितकं अनुभवता येईल, तितकं अनुभवणं.
सुंदरतेच्या सुमानंवरचं दव चुंबून घेणं.
आपली आपण ‘स्पेस’ तयार करणं, त्यात भव्यतेनं जगणं.

मजेत जगणं म्हणजे
प्रौढत्वी निजशैशवास जपणं.
तनमनानं स्वस्थ असणं. सदाबहार, चिरतरुण असणं.
जीवनात दंग असणं, प्रेमरंगी रंगून जाणं.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करणं.
जीवनात भान हरपायची स्थानं शोधणं.
मजेत जगणं म्हणजे
नित्य बदलत्या आयुष्याचं स्वागत करणं.
अपयशातून जाणतं होणं, संकटातून सुदृढ होणं, दुःखांतून प्रगल्भ होणं.
रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणं.
मजेत जगणं म्हणजे
आपलं आयुष्य आपण घडवणं आणि आयुष्याचं
‘ऋण’ चुकतं करणं. प्रामाणिकपणे स्वतःचा उत्कर्ष साधता साधता
इतरांचीही आयुष्यं उजळवणं.
स्वतःचं जगणं सुंदर, समृद्ध करता करता
भोवतालचं जगही थोडं अधिक सुंदर करून जाणं.
जिओ तो ऐसे जिओ, जैसे सब तुम्हारा है
मरो तो ऐसे कि, जैसे तुम्हारा कुछ भी नाही!

वाचक लिहीतात..
सस्नेह नमस्कार,
मी एक उच्चरक्तदाब व डायबेटीसमुळे पक्षघात झालेला रुग्ण. डावी बाजू संपूर्ण निकामी झालेली. सिंगापूरला मुलाकडे रहात आहे. नुकतेच मुलाचे एक स्नेही पुण्यास दिवाळीसाठी आले असताना त्यांनी आपले ‘मजेत जगावं कसं?’ हे पुस्तक आणलं व मला वाचायला म्हणून दिलं. पुस्तकाच्या मुख्यपृष्ठावरूनच ‘मजेत जगावं कसं?’ हे जाणवायला लागतं. सबंध पुस्तक वाचून संपवलं. या आधी मी डॉ. अरविंद बावडेकरांच ‘कॅन्सर माझा सांगाती’ हे पुस्तक वाचलं आहे. ही दोन्ही पुस्तकं मला, माझ्यासारख्या एका जरा-जर्जर माणसाला जगण्याचं एक मोठं बळ देतात. विशेषतः सकारात्मक दृष्टीकोन वाढवून जगण्यातला आनंद कसा घ्यावा हे सांगायला अतिशय उपयुक्त वाटतात. खरंच माझ्या हातातला अर्धा पेला रिकाम होता. दुसऱ्या हाताने तो भरू शकत नव्हतो. तो भरण्याचं काम तुमच्या पुस्तकाने केले आहे. तुमचं नाव शिवराज गोर्ले ऐवजी आनंद गोर्लेच असायला हवं होतं! धन्यवाद.
आपला स्नेहेच्छु
जगदीश जोशी
सिंगापूर

 

श्री. शिवराज गोर्ले यांना,
‘मजेत जगावं कसं?’ पुस्तक वाचलं. मन आनंदून गेलं. तुमचं पुस्तक वाचून मराठी तरुणांत आणखी शंतनुराव किर्लोस्कर व गजानन पेंढरकर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. अमेरिकेच्या टेलिफोन डायरीत गुजराती पटेल जास्त दिसतात. तुमच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन त्या यादीत जोशी-कुलकर्णी अशा नावांची भर पडेल. या पुस्तकाची इतर भाषात भाषांतरे व्हायला हवीत. पुस्तक इंग्रजीतही आले तर जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ते पोहचेल. खूप खूप अभिनंदन.
द. सो. जोशी
कुळगाव जि. ठाणे.

शिवराज गोर्ले साहेब,
‘मजेत जगावं कसं?’ हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. बोधक आहे. जितक्या वेळा वाचावे तितके थोडेच. मी ५८ वर्षाचा एक शेतकरी आहे. असं वाटतं हे पुस्तक १५ वर्षांपूर्वी होती यायला हवं होतं! पण आता हे पुस्तक मी निराश होणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना वाचायला देईन, शिवाय माझ्या दोन्ही उच्चशिक्षित मुलींना आणि माझ्या परिसरातील नवोदित लेखकांनाही ते वाचायला सांगेन.
रमेश अनंत राऊत
ता. पालहार

शिवराज गोर्ले,
सप्रेम नमस्कार,
आपलं ‘मजेत जगावं कसं?’ हे पुस्तक २००४ साली विकत घेतलं, तेही असंच एका हतबल क्षणी. २००३ साली माझा नवरा अचानक गेला. माझं वय ३२, मुलाचे १०.जाताना तो पुण्यात एक फ्लॅट व तुटपुंजी पेन्शन ठेवून, गेला होता. माझं गांव मराठवाड्यातलं एक छोटसं खेडं वेरूळ, त्यामुळे बेताचंच शिक्षण. फक्त वाचनाचा नाद व कष्ट करण्याची तयारी व अंगी असलेली हुशारी यावरच भर दिला. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत टायपिंग व काम्प्युटर शिकून घेतला. अनेक छोटया छोटया नोकऱ्या केल्या, शिकणं आणि कमवणं व मुलाला शिकवणं अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलत आहे. आता मुलगा १२वी पास झाला, तसेच सी. ए. ची पहिली परीक्षाही पास झाला. आयुष्यात स्थिरपणा आला आहे. पण जव्हा जेव्हा अपयश आलं, एकट वाटलं, लोकांशी वाद झाले, दुखः झालं तेव्हा आपलं पुस्तक वाचलं, मनाला खूप उभारी मिळाली, किती वर्षापासून आपल्याला पत्र लिहायचं होत पण राहूनच गेलं. आज ‘सकाळ’मधील आपला लेख वाचून ठरवलच की, आपल्याला इमेल पाठवायलाच पाहिजे. सर मनापासून सांगते, माझा एक हात गेला पण मला अनेक चांगले हात भेटले व त्यांनी मला त्यांच्या प्रवाहात सामावून घेतले. सकारात्मक पद्धतीनं आयुष्य जगणं कठीण जातं, पण त्याचे फायदे निश्चितच मिळतात. हे मला आता पटायला लागलं. नाहीतर मला नेहमीच माझ्यावर अन्याय झाला, आपल्याच वाटयाला काय हे असं वाटत असे. पण जेव्हा इतरांचे दुःख बघतो तेव्हा आपण खूप सुखी हा सुखी असा विचार मनात येतो. ‘मजेत’चं माझ्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे.
शुभांगी कुलकर्णी, पुणे

नमस्कार. सर मी तुमच्या ‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाची एक वाचक, सर, मी. एफ वाय बीएससी या वर्गात शिकत आहे. खरंतर १७, १८ हेच वय असतं, काहीतरी समजून घेण्याचं, आपले मार्ग निवडण्याचं, आणि कोणीतरी सांगितलेलं ऐकून समजून घेऊन जीवनाला योग्य दिशा व गती देण्याचं. माझा आदर्श, मला योग्य मार्गदर्शन करणारी कोणी व्यक्ति नसून एक असामान्य पुस्तक आहे. ते म्हणजे तुम्ही लिहिलं ‘मजेत जगावं कसं?’ हे पुस्तक आहे. सर, तुमच्या पुस्तकानेच मला जीवनाकडे बघण्याचा नवा व योग्य दृष्टीकोन दिला आहे.
‘मजेत जगावं कसं?’ हे पुस्तक वाचताना मी एकेक मुद्दा वाचून, त्यावर थोडा विचार करून नीट समजावून घेत वाचला. त्यामुळे आता ह्या पुस्तकातील प्रत्येक शब्द-न् शब्द माझा पाठ झाला आहे. जीवन नेमकं कसं आहे, त्याला कसं आनंदाने हसतं सामोरे जायचं, त्याचे वेगवेगळे पैलू उलगडून मजेत कसं जगावं हे तुमच्या पुस्तकाने अर्थातच माझ्या आदर्शाने शिकवले. जगण्याचा आनंद घ्यायला शिकवले. तसेच जीवन जगायला शिकवले.
आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनांचा स्वीकार करण्याची धमक माझ्यात ‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाने आली. त्यामुळे सर तुमचे आणि तुमच्या ह्या पुस्तकाचे माझ्यावर कायम ऋण आहेत. मला जेव्हा कधी उदास वाटतं, तेव्हा मी पुस्तक घेऊन बसते. एखादा भाग वाचून काढते, पुन्हा रिचार्ज होण्यासाठी.
खरं सांगायचं झालं तर माझ्यासारख्या भान हरपलेल्या, निराश मुलीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरले. घरची परिस्थिती नसतानाही मी दहावी नंतर शास्त्र शाखा घेऊन दररोज १८ किलो मीटर चालत जाऊन बारावीला ७३.८३% मिळवले, परंतु वडील हाताने अपंग, आई कायम आजारी, छोटया भावाचं शिक्षण ह्यामुळे पुढे शिकायचं नाही असं मी ठरवलं. परंतु त्याच वेळी माझ्या एका मैत्रिणीने हे पुस्तक माझ्या हातात दिले. आणि मी ते पुस्तक वाचून काढले. पुस्तक वाचल्यानंतरची मी आणि आधीची मी ह्यात खूप फरक होता. तुमच्या पुस्तकामुळेच मला समजले ‘आय कॅन डू’ व त्यामुळेच मी एफ. वाय. बीसीएससी ला अॅडमिशन घेऊ शकले. शिवाय मी कॉलेजच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेत भाग घेतलाय. त्यामुळेच मी तुमची आणि तुमच्या पुस्तकाची आभारी आहे.
सर, मला तुमच्या पुस्तकाने खूप काही दिले आहे, तरीही, तुमच्याकडे एक मागू इच्छिते. सर, तुम्ही माझ्या पत्राचे प्रच्युत्तर मला नक्की पाठवा ही अपेक्षा. तुमचं एक पत्र मला जीवन जगण्यासाठी व प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची नवी प्रेरणा देईल. मी तुमच्या पत्राची आतुरतेने वाट पाहतेय. तसद्दी बद्दल क्षमस्व नक्की पत्र पाठवा, ही विनंती.
कळावे,
आपली नम्र
निशा सिद्धार्थ कदम
मु. पो. निवेंडी वरची, ता. जि. रत्नागिरी.