माणसं जोडणं म्हणजे काय?
माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रभावित करणं,
माणसांवर प्रभुत्व गाजवणं नव्हे.
माणसं जोडणं म्हणजे मनमोकळं, मतमोकळं असणं.
मनाचं मनाशी नातं जोडणं.
माणसं जोडणं म्हणजे अंतरीच्या जिव्हाळ्यासाठी
‘जिवंत’ निमित्तं शोधणं.
माणसं जोडणं म्हणजे प्रत्येक माणूस
वेगळा असतो, याचं भान ठेवणं.
‘वेगळेपण’ जपता जपता ‘जुळलेपण’ ही जोपासणं.
माणसं जोडणं म्हणजे स्वतःला ‘हरवणं’ नव्हे,
तर नात्यांच्या माध्यमातून स्वतःचाच शोध घेणं.
माणसं जोडणं म्हणजे कुणीच परिपूर्ण नसतं.
हे सत्य स्वीकारणं.
आपण स्वतःच्या चुकांकडे पाहतो,
तसचं इतरांच्या चुकांकडे पाहणं.
माणसं जोडणं म्हणजे स्वतःला ‘मोठं’ करण्यासाठी
कुणाला कमी न लेखणं, नाउमेद न करणं.
माणसं जोडणं म्हणजे सौजन्याची साथ धरणं.
आपल्या व्यक्तित्वातील काटे
इतरांना बोचणार नाहीत, याची दक्षता घेणं.
सहज, स्वाभाविक, वागणं, पण
स्वभाव बदलताही येतो, याची जाण ठेवणं.
माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला
‘तो आहे’ तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं इतरांवर न लादणं.
माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं.
माणसं जोडणं म्हणजे माणसांवर ‘शिक्के’ न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा – हे स्वतः जाणणं
आणि त्यालाही ते जाणवू देणं.
माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं,
तक्रार मात्र जपून करणं.
माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे,
तर प्रतिसाद देणं.
रागाचंही रुपांतर लोभात करता येणं.
माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता
स्वतःचं मन साफ करणं.
माणसं जोडणं म्हणजे अपमानाचा बदला
मानानं घेणं, टीकाकारांचीही दाद मिळवणं.
मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, हे ओळखणं.
माणसं बदलली, तरी इतिहास न बदलणं.
जिव्हाळा जपता आला नाही, तरी कटुता टाळणं.
माणसं जोडणं म्हणजे मदतीची संधी घेणं.
इतराचं शक्य तितकं भलं करणं.
भलं करता आलं नाही, तरी
नुकसान न करणं... कुणाची संधी हिरावून न घेणं.
माणसं जोडणं म्हणजे माणसांना वापरणं नव्हे,
तर त्यांना आपल्या स्वप्नात सहभागी करून घेणं.
माणसं जोडणं म्हणजे कृतज्ञ राहणं,
श्रेयाच्या मोहात न पडणं.
माणसं जोडणं म्हणजे समाजाचं ऋण चुकतं करणं,
स्वहित साधत साधता, ‘स्व’ विस्तारत नेणं.
माणसं जोडणं म्हणजे ‘कामाचे संबंध’ सुरळीत ठेवणं.
संबंधांइतकंच कामाला महत्व देणं.
कामाशी प्रामाणिक राहणं, आवश्यक तिथं ठाम राहणं.
माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रेरित करणं, दिशा देणं.
माणसं जोडणं म्हणजे नाती
बदलू शकतात, याचं भान ठेवणं.
‘इतुके आलो जवळ जवळ की
जवळपणाचे झाले बंधन’ हे टाळणं.
नात्यांमध्येही एकमेकांसाठी
पुरेसा अवकाश ठेवणं.
माणसं जोडणं म्हणजे
‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे गाणं आळवणं.
माणसं जोडणं म्हणजे माणसाचा धर्म पाळणं.
माणसं जोडण्यातल्या ‘यशा’चा आनंद अनुभवणं.
वाचक लिहितात..
श्री. शिवराज गोर्ले यांस,
आपल्या ‘माणसं जोडावी कशी?’ या पुस्तकानं तर आमच्या महाविद्दालयात सर्वांना वेड लावलं आहे. कुठूनही उघडावं आणि वाचतच राहावं! आमच्या प्राचार्य डॉ. गीता लाटकर यांनी तर या पुस्तकातील काही उतारेच कर्मचाऱ्यांच्या मीटिंगमध्ये वाचून दाखवले. एवढेच नव्हे तर पुस्तकाच्या ११५ प्रती आणून नव्या वर्षानिमित्त कर्मचाऱ्यांना भेट दिल्या.
गोविंद हंबर्डे
ग्रंथपाल, महात्मा गांधी मिशन्स इंजिनिअरिंग कॉलेज, नांदेड
प्रिय श्री गोर्ले सर
तुमचं ‘माणसं जोडावी कशी?’ हे पुस्तक वाचलं आणि मला आईची आठवण झाली. मी आठ वर्षांची असतानाच आई गेली. पण आता तुमच्या या पुस्तकाला मी ‘आईची जागा’ दिली आहे. आज ती असती तर तिने असेच संस्कार माझ्यावर केले असते. तुमचं पुस्तक नव्या पिढीला घडविण्यात मोलाची भूमिका निभावेल, यांची मला खात्री आहे.
शीतल दलाल
बेळगाव
