मस्त राहावं कसं?
मस्त मजेत जगावं, आनंदात राहावं
असं प्रत्येकालाच वाटत असतं,
पण तिन्ही त्रिकाळ आनंदाची ‘गॅरंटी’
कशी देता येईल?
आयुष्याच्या वाटेवर
काही दुःख दबा धरून बसलेली असतात.
जोडीला चिंता, निराशा, भीती ही पिल्लावळ असते.
शिवाय ताणतणावही मुबलक असतात.
पण करणार काय –
आजच्या गतिमान युगात
प्रगती साधायची असेल
तर गाडी ‘एक्सप्रेस-वे’ वरूनच घ्यावी लागते.
जरूर घ्या.
पण प्रथम ‘शॉक अॅब्सॉर्बर’ चेक करून घ्या.
आयुष्याच्या गाडीचा हा ‘शॉक अॅब्सॉर्बर’
म्हणजेच विचारविवेक.
डॉ. अल्बर्ट एलिस यांचा अनोखा
दुःखप्रतिबंधक फॉर्म्युला.
हा फॉर्म्युला जाणून घ्या
आणि... मस्त राहा! मजेत जगा!!
वाचक लिहितात..
श्री शिवराज जी
तुमचं ‘मजेत जगावं कसं?’ संग्रही आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. अनेक पेशंटसना तुमचं पुस्तक वाचायला सुचवित असतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणं ‘बरं वाटणं’ यातील ‘वाटणं’ हा भाग मानसिकच असतो. चांगल्या मानसिक प्रकृतीसाठी अशी प्रेरक, सकारात्मक पुस्तकं नक्कीच कामी येतात तुमचं ‘मजेत जगावं कसं?’ सुद्धा ‘मस्त’च आहे. आर. इ. बी. टी. बद्दल ऐकलं होतं. वाचलं प्रथमच. ‘विचारविवेक’ म्हणून तुम्ही जे सुलभ विवेचन केलंय ते सुंदरच आहे. अनेक डॉक्टरांनाही ही इतकी उपयुक्त पध्दती ठाऊक नसते. त्यांनी तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
मी माझ्या डॉक्टर मित्रांना तुमचं पुस्तक रेकमेंड करणार आहे. तुमची पुस्तकं आमच्यासारख्यांच्या उत्साह वाढवीत असतात. नवं ज्ञान, विचारही देत असतात. खूप खूप थँक्स.
आपला,
डॉ. संजय देवस्थळी, लातूर
