सांगा कसं जगायचं?
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
असं तुम्हाआम्हालाही वाटत असतं, पण
आयुष्य म्हणजे अवघा आनंद थोडाच असतो?
दुखः असतं... अपयश असतं.. निराशा असते
अडचणी असतात.. समस्या असतात..
त्यातलीच एखादी कसोटी पाहणारी असते.
त्या समस्येत आपण इतके गुरफटून जातो
की बाहेर पडण्याचा मार्गच सुचेनासा होतो.
अशा वेळी आपल्या समस्येकडे काहीशा तटस्थपणे
पण तितक्याच जिव्हाळ्याने पाहणाऱ्या कुणी,
मित्रत्वाचा सल्ला दिला तर तोही मोलाचा ठरू शकतो.
प्रेम, मैत्र, लग्न, संसार, शिक्षण, करिअर
नातेसंबंध, भावनिक पेच, मानसिक संघर्ष...
जीवनाच्या नाना अंगांना भिडणाऱ्या समस्या
आणि त्यांच्या अनुषंगाने साधलेला
हा अनोखा पत्रसंवाद,
जो तुमचंही भावविश्व नक्कीच समृध्द करेल.
वाचक लिहितात..
सादर प्रणाम
‘सांगा कसं जगायचं?’ हातात आहे. रिअली वंडरफुल. आजच्या काळात असं पुस्तक अगदी गरजेचं होतं. ‘पत्रसंवादातून’ तुम्ही नाना ‘प्रॉब्लेम्स’ कुशलतेनं हाताळले आहेत.
पुस्तक हे एखादया ‘गुरु’ सारखं असतं – आणि ते केव्हाही, कुठेही उपलब्ध असतं. अशा सुरेख मार्गदर्शनाबद्दल समाज तुमचा ऋणी राहील.
आम्ही सारे ज्येष्ठ नागरिक तुमच्या पुस्तकाच्या वाचनानं आनंदित झालो आहेत. आम्हा सर्वांच्या वतीनं अगदी हार्दिक धन्यवाद.
आपला
एन. व्ही. दुलांगे आणि ज्येष्ठ नागरिक
मुलुंड (पश्चिम), मुंबई.
