तमाशा कलावंताचं जीवन तसं खडतर असतं. तमाशा कलावातींना प्रसिद्धी मिळाली तरी प्रतिष्ठा नसते. हाच धागा घेऊन गोर्लेंनी ही पटकथा गुंफली होती. महाराष्ट्राला एकेकाळी वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रातील काही विलक्षण घटनांची डूब देऊन यातील प्रमुख कलावतीचं पात्र उभ केलं होतं. ती स्वतः तमाशाकलेला पूर्णतः समर्पित असते, तरी तिनं स्वतःच्या मुलीला मात्र शिक्षणासाठी दूर होस्टेलवर ठेवलेलं असतं. तिनं पदवीधर होऊन, एखाद्या चांगल्या घराण्यातल्या मुलाशी लग्न करून संसार करावा – तिची आपल्यासारखी परवड होऊ नये – अशी आईची इच्छा असते.
पण घटना अशा घडतात की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तिच्या मुलीलाही पायात चाळ बांधावे लागतात. तिचं व्यक्तिमत्व, तिची कला पाहून एक साखर सम्राटाचा मुलगा तिच्या प्रेमात पडतो. पण तमाशात नाचणारी मुलगी माझ्या घरात सून म्हणून येऊ शकत नाही – असं म्हणत साखरसम्राट विरोध करतात मग सुरु होतो संघर्ष, प्रेमाचा अन् तथाकथित प्रतिष्ठेचा, सत्ता आणि कलेचा. हा अटीतटीचा संघर्ष म्हणजेच ‘सवाल माझ्या प्रेमाचा’.
कलावंतही एकापेक्षा एक होते. मधु कांबीकर यांनी तमाशा कलावतीची भूमिका अक्षरशः जिवंत केली होती. भूमिकेशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या की एका नृत्यातील ‘लोळणदृश्या’चे वेळी त्या स्टेजवरुन खाली पडल्या होत्या. सुदैवानं विशेष दुखापत झाली नव्हती.
प्रारंभी कॉलेज कन्या आणि नंतर नृत्यांगना या दोन्ही भूमिका वर्षा उसगावकर यांनी समर्थपणे पेलल्या होत्या. अजिंक्य देव यानं तगडा प्रेमवीर साकारला होतं, तर विजय चव्हाण यांनी ‘नाच्या’च्या भूमिकेत धमाल उडवली होती. पण खास आकर्षण होतं ते ‘साखर सम्राट’च्या भूमिकेतील अशोक सराफ यांच्या अभिनयाचं. सत्ताधारी, प्रतिष्ठित, कावेबाज, रसिक, पिता... अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा अशोकजींनी विलक्षण ताकदीनं पेश केल्या होत्या.
