वृत्तपत्रीय स्तंभलेखन किंवा सदरलेखन हा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा अत्यंत प्रभावी असं मार्ग. मात्र एखादया वृत्तपत्रातून वर्षभर एखादं सदर लिहिणं हे वाटतं तितकं सोपं मात्र नसतं... मग ते दैनिक सदर असो की साप्ताहिक. प्रत्येक वेळी नवा विषय शोधून, त्यावर विशिष्ट शब्द मर्यादेत-काहीशा तातडीने लिहूनही, त्यातला डौल टिकवून ठेवणं, यासाठी काही वेगळं लेखनकौशल्य लागतं. वाचकांच्या अपेक्षा सतत वाढत असतात. त्या पुऱ्या करीत सदरातील ताजेपणाही जपत ठेवणं, ही एक कसरतच असते.
विनोदाची डूब असलेल्या साध्या, सोप्या भाषेत वाचकांशी संवाद साधण्याची गोर्लेंची शैली, वृत्तपत्रीय सदरलेखनासाठी जरा जास्तच सुयोग-मोअर दॅन परफेक्ट होती! त्याची ही एक झलक -
साक्षात्कार
लोक राजकारणात का जातात? एक समाजशास्त्रज्ञानं असं शोधून काढलं होतं की जी लहान मुलं माती खाणं, गोटी गिळणं याऐवजी नाणी गिळतात... म्हणजे पैसे खातात ती मोठी होऊन राजकारणात जातात. याचा सरळ अर्थ होतो-लोक राजकारणात पैसे खाण्यासाठी जातात. छे छे.. हे चूक आहे. राजकारणात माणसं जातात ती सत्ता मिळवण्यासाठी. सत्ता मिळाली की समाजाचं भलं करता येतं, सेवा करता येते. पैशाचं असं आहे की तो निवडणुकांसाठी खर्च करावा लागतो. कार्यकर्त्यांची म्हणजे बहुधा कामधाम न करणाऱ्या (पालकांच्या भाषेत ‘उंडारणाऱ्या’) तरुणांची फौज पोसावी लागते. नेत्यांच्या वाढदिवसाला मोठाल्या जाहिराती, होर्डिंग्ज उभारावी लागतात. म्हणजे खर्चासाठी पैसा लागतो. मुख्य म्हणजे सत्ता आली की पैसा पाठोपाठ येतोच... लोक पैसे घेऊन ‘घ्या...घ्या...’ म्हणून मागे लागतात. येणाऱ्या लक्ष्मीला कसं नाकारायचं? शिवाय या प्रचंड पैशातले पाचदहा टक्के गरिबांसाठी पाणपोई बांधण्यासाठी कामी येतात. पाणपोई कुणी बांधली हे गरिबांना कळावं, म्हणून त्या पाणपोईला स्वतःच्या आईचं नाव देता येतं. आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता येते.
मुद्दा असा की लोक राजकारणात समाजसेवा, गरीबांचा थोडा बहुत उद्धार करण्यासाठी जातात. पक्ष निवडतानासुद्धा तत्वं बघून पक्ष निवडतात. ज्याला हिंदुत्व आवडतं तो भाजप किंवा शिवसेनेत जातो... वगैरे. पण एकदा पोस्टात (नोकरीला) चिकटलं की कायमचं स्टॅम्पासारखं चिकटणं हे राजकारणात चालत नाही. राजकारणात कधीकधी पक्ष बदलावे लागतात. मंडळी पक्ष का बदलतात? उत्तर सरळ आहे, तत्वासाठी!
छगन भुजबळ हे शिवसेनेचे खंदे समर्थक – नेते पण त्यांनी शिवसेना सोडली. का सोडली? लोक म्हणतात. शरद पवारांनी त्यांना फोडलं. अरे, भुजबळ म्हणजे काय नारळ आहेत फोडायला? भुजबळांना साक्षात्कार झाला – शिवसेनेत सवर्णांचं वर्चस्व आहे, जातीय राजकारण खेळलं जातं – असा साक्षात्कार झाला म्हणून भुजबळांनी शिवसेना सोडली आणि सामाजिक समतेला वाहून घेतलं. त्याशिवाय का त्यांनी समता परिषद काढली? जरा विचार करा की! तसेच राज ठाकरे. ते तर शिवसेनाप्रमुखांचे मानसपुत्र छोटे बाळासाहेब! बाळासाहेब म्हणजे त्यांचं दैवत. तरीही त्यांनी शिवसेना का सोडली? लोक म्हणतात, उद्धव ठाकरे आडवे आले. राज ठाकरेंना म्हणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. हे खरं नव्हे. आमच्या मते, राज ठाकरे यांना महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचंय. शिवाय ‘मराठी’ चा मुद्दा आहेच. मराठी बेकार तरुणांच्या हातांना काम द्यायचंय. सुरवात म्हणून त्यांनी अशा तरुणांच्या हातांना इंग्रजी पाट्यांवर दगड फेकायचं काम दिलंच आहे... हळूहळू मोठी कामंही देतील. राज ठाकरे हेच महाराष्ट्राचं नवनिर्माण करु शकतील, असा साक्षात्कार झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठोपाठ तिकडे गेले होते. पदांच्या अपेक्षेमुळे नव्हे! पण पुण्याच्या खडकी कॅन्टोनमेन्टच्या ‘मनसे’च्या पाच पदाधिकाऱ्यांना एकसमयावच्छेदेकरून साक्षात्कार झाला-हिंदुत्वासाठी शिवसेनेत परत जा! ते गेले स्वगृही परत. पण पुन्हा लोक म्हणतात – ते गेले मनसेतील अंतर्गत मतभेदामुळे! हे अजिबात बरोबर नाही. राजकीय मंडळी पक्षांतर करतात ते केवळ तत्वासाठी, या चिरंतन सत्याचा ‘साक्षात्कार’ लोकांना कधी होणार आहे?
