प्रेरक साहित्य - स्त्री विरूध्द पुरुष ?

एकेक पाउल पुढे
स्त्री आणि पुरुष म्हणजे ‘संसार’ रथाची दोन चाके
आविष्कार ‘माणूस’पणाचे – किती वेगळे, किती सारखे?
निसर्गानेच पेरले आहे – दोघांमधले वेगळेपण
त्यातूनच तर टिकून आहे – स्वाभाविकसे आकर्षण!
जीवनाचे चक्र हे अखंडित चालूच हवे
निरोप घेईल वृध्द कुणी – येईल कुठे बाळ नवे!
स्त्री-पुरुष भेद होते – तरीही भेदभाव नव्हता
पुरुष झाला संरक्षक – स्त्री जेव्हा झाली माता.
शरीराचे बळ होते – शिकारकाम पुरुषाचे
संगोपनासाठी बाळाच्या – घरकुल झाले स्त्रीचे.
घरकुलाच्या स्थिरतेने – स्त्रीची फुलली मती
तिने शोधली शेती अन् मातीमधले मोती.
स्त्रीनेच साधली प्रगती – स्त्रीनेच घडवली संस्कृती
स्त्री पुरुषांची तिनेच निर्मिली नवी नवी नाती!
पुरुषांच्या सामर्थ्याला वाट दाखवली समृद्धीची
ओबडधोबड निर्मितीला जोड दिली सुंदरतेची.
पण...सारे पुरुष सारखे नव्हते, काही होते नतद्रष्ट
सुखोपभोग हवे होते – नको होते कष्ट!
शेतीभाती फुलविण्यात स्त्री-पुरुष दोघे दंग
त्यांचेच सारे लुटण्याचा, दुष्टांनी बांधला चंग.
लुटालूट आणि दंगेधोपे – सत्रच सुरु झाले
स्त्रिया-पुरुष-मुलांनाही जगणे मुष्किल झाले.
ज्यांनी लुटली मालमत्ता, त्यांच्या हाती सत्ता आली
कष्टकऱ्यांच्या नशिबी मात्र, गुलामीची बेडी आली.
तशातच लागला त्यांना,
अपत्यसंभवातील पुरुषाच्या सहभागाचा पत्ता.
नको तेच नेमके झाले
मुले हक्काची मजूर झाली – स्त्री ही झाली मालमत्ता.
इतके सारे झाले तसे
स्त्रीला सुरक्षित ठेवणे हेच खरे गरजेचे झाले,
नाइलाजाने का होईना
पण स्त्रियांनीही त्यासाठीच बंदिस्तपण स्वीकारले.
सत्तेच्या हाती संस्कृती गेली – नवे नवे धर्म आले,
पुरुषांनीच ठरवली नीती – पुरुषच धर्मगुरू झाले!
पत्नीसाठी पती हा तर ‘देव’ ठरला गेला,
मातृत्वाचा मात्र नावापुरता, उदो उदो झाला.
‘चूल आणि मूल’ याभोवती स्त्री बांधली गेली,
प्रज्ञा आणि प्रतिभा तिची – चार भिंतीतच राहिली.
मातृत्व होता अधिकार तिचा – होती तिची सृजनक्षमता
मतलबी पुरुषांनी मात्र – तीच तर ठरवली कमतरता!
काळ बदलला...पुरुष आता राज्यकर्ते झाले
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे – उद्योगीकरण आले.
सुधारकांच्या सौजन्याने – वातावरण थोडे बदलले,
पुरुषांबरोबर स्त्रियांनाही शिक्षण मिळू लागले.
शिक्षणाच्या प्रभावाने स्त्री धीट होत गेली,
चार भिंती ओलांडून घराबाहेर पडली.
विकासाची नवनवी क्षितिजे शोधू लागली.
स्त्री मिळवती झाली, पण तिने नेमके काय मिळवले?
घरचे आणि बाहेरचे – दोन्ही तिच्याच माथी आले!
रुढी, परंपरा यांचे ओझे – होते तसेच राहिले.
शिक्षित होऊनही स्त्रीला – दुय्यम लेखले गेले.
खूप काही बदलले, तरी स्त्रियांची बदलली नाही स्थिती
ना सुरक्षित, ना स्वरक्षित – अशीच राहिली परिस्थिती.
स्त्रीवाद, स्त्रीमुक्तीचे मग नारे उठू लागले,
देशोदेशी चळवळींचे सत्रच सुरु झाले.
समतेसाठी कुठेकुठे समाजवादी क्रांती झाली
सरकारी रसोईघरे आणि पाळणाघरेही आली.
मुलांचीही जबाबदारी शासनाने स्वीकारली,
बदल्यात मात्र प्रत्येक स्त्री ‘कामगार’ होऊन बसली.
आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही जणू नवी सक्ती झाली...
कल्याणाच्या नावाखाली अखेर हुकूमशाहीच आली.
‘डावे’ मार्ग फसले, तरी प्रश्न तसेच राहिले
लोकशाही देशांतही लढे उभे राहिले.
दुय्यमता चालणार नाही – विषमता चालणार नाही,
‘स्त्री’ म्हणून डावललेले – खपवून घेतले जाणार नाही!
मान्य करा स्त्रीलासुध्दा असते तिचे ‘स्व’त्व
माणूस म्हणूनच तिलाही आपलं स्थान हवं.
कायदेकानू झाले खरे – पण कागदोपत्री राहिले,
संघर्षाविना स्त्रियांनाही पर्याय नाही उरले.
कशाला हवंय लग्न – कशाला हवंय बंधन
मर्जीने जगू आम्ही – लग्नाशिवाय सहजीवन.
करिअर हवे काहींना, फक्त नको आहे मातृत्व
एकटीनेही राहण्यासाठी स्त्रीला स्वातंत्र्य  हवं.
नव्या अशा प्रयोगांचे
स्वागत करायला काहीच हरकत नाही,
एका मात्र नक्की
पुरुषविरहित जगात स्त्रियांनाही राहायचे नाही!
सवाल खरा नाही लग्नाचा/बिनलग्नाचा
सवाल आहे तो घराला ‘घरपण’ देण्याचा.
प्रश्न आहे काही घेण्याचा – प्रश्न आहे काही देण्याचा,
मार्ग त्यासाठी एकच आहे – परस्परांच्या पूरकतेचा.
स्त्री पुरुष सहजीवन – एवढेच साधून भागणार नाही,

मुला-मुलींचे संगोपनही – दुर्लक्षून चालणार नाही.
एकमेकांविना स्त्री-पुरुषांचा – खरा विकास शक्य नाही
समन्वयाशिवाय दोघांच्याही – समाजाला स्थैर्य नाही.
म्हणूनच ‘स्त्री विरुध्द पुरुष’ यापुढे प्रश्नचिन्ह आहे...
स्त्री-पुरुषांचा संघर्ष – खरेच का अटळ आहे?
तमाम स्त्री-पुरुषांना हे एकच आहे साकडे,
पवित्रा सोडून संघर्षाचा – जाऊ या का समन्वयाकडे?
हवा मात्र परस्परांमधल्या ‘माणूसपणा’ वर विश्वास
मनात हवी खरीखुरी सुखशांतीची आस.
अवघड जरूर आहे – अशक्य मात्र नक्कीच नाही,
हेही खरे की बदल काही – एका रात्रीत होत नाही.
एवढेच की शिकावे लागतील – नवे काही धडे
निर्धाराने टाकावे लागेल – एकेक पाऊल पुढे!

 

वाचक लिहितात...
शिवराजजी,
‘स्त्री विरुध्द पुरुष’ हे शीर्षक – शिवाय नंतर तुमचं आवडतं प्रश्नचिन्ह... पुस्तक प्रदर्शनात दिसलं आणि विकतच घेतलं. प्रारंभीचं तुमचं ‘एकेक पाऊल पुढे’ हे किती वेळा वाचलं असेल, याला गणतीच नाही. मला तर वाटतं – हे काव्य मुलामुलींसाठी शाळेच्या पाठ्यपुस्तकातच यायला हवं. पुढची पिढी तरी समजुतीनं नांदेल. पुस्तक तसं अगदी हलकंफुलकं नाही – पण तरीही हा विषय सर्वांगानं एवढा सोपा करून दुसरं कोण सांगू शकेल? अप्रतिम. खरंच. प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं पुस्तक वाचायला हवं. माझ्या मुलाचं लग्न झालं आहे – त्याला आणि सुनेला ‘डाव मोडू नको’ हे प्रकरण वाचायला लावणार आहे. मुलगी अजून लग्नाची आहे. तिला ‘जोडीदाराची निवड’ हे वाचायला सांगणार आहे. आजकालचे तरुण पूर्ण पुस्तक वाचणं जरा अवघडच – म्हणून हा शॉर्टकट. पण स्त्री-पुरुष संबंधाचे तमाम सारे पैलू समजून घ्यायचे असतील, तर तुमचं पुस्तक किमान एकदा – वाचण्याशिवाय पर्याय नाही. इतकं सुंदर, अर्थपूर्ण पुस्तक आम्हाला दिल्याबद्दल तुमचे व जयश्री रावळेकर यांचे मनःपूर्वक आभार.
आपली,
प्रतिमा लोखंडे, औरंगाबाद