पोलीसदलातीलआपल्या वडिलांची करिअर उद्ध्वस्त करणाऱ्या खलनायकाचा सूड घेण्यासाठी नायिका स्वतः ‘पी एस आय’ होते. पण कायद्याच्या चौकटीत राहून तिला खलनायकापर्यंत पोहोचता न आल्यानं ती तुरुंगाची हवा खाणाऱ्या एका निर्ढावलेल्या गुंडालाच सुपारी देते. त्यात ‘जेलर अंकल’ तिची मदत करतात.
तो गुन्हेगार गुपचूप तुरुंगातून सुटतो व नायिकेनं दिलेलं मिशन सुरु करतो. मात्र त्या दरम्यान दोघे एकमेकांशी जितकं फटकून वागण्याचा प्रयत्न करतात तितकेच एकमेकांकडे आकर्षिले जातात.
मिशन पुरं होतं... पण आपण एक गुन्हेगाराच्या प्रेमात पडावं या कल्पनेनं नायिका स्वतःवरच प्रचंड संतापते. ‘इतकं संतापण्याची काहीच गरज नाही’ जेलर अंकल तिला समजावतात. ज्याला ती गुन्हेगार समजत असते , तो गुन्हेगार नसतोच. तो खरा सी. बी. आय अधिकारीच असतो. ‘जेलर अंकल’नीच त्याला ‘गुन्हेगार’ म्हणून नायिकेच्या ‘गुप्त मिशन’साठी तयार केलेलं असतं.
अजिंक्य देव, वर्षा उसगावकर, प्रशांत सुभेदार, शरद तळवलकर... हे प्रमुख कलाकार होते. चित्रपटातले ‘फायटिंग सीन्स’ हे खास ‘बॉलीवूड स्टाईल’नं चित्रित करण्यात आले होते.
‘सलीम जावेद’ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत – चित्रपटाच्या यशात प्रभावी संवादाचा किती वाटा असू शकतो, हे सिद्ध केलं होतं. हिंदी भाषेतला ‘जोश’ मराठीत आणणं, हे एक आव्हानच होतं. म्हणूनच मराठी चित्रपटातही जबरदस्त ‘डायलॉग्ज’ लिहिण्याची संधी या दृष्टीनं गोर्लेंनी ‘सूडचक्र’कडे पाहिलं. ‘थरथराट’ प्रमाणेच ‘सूडचक्र’च्या संवादांची कॅसेट निघायला हवी होती, असं गोर्लेंना अजूनही वाटतं.
रहस्य व साहसाचे वेधक मिश्रण
सूडकथेला आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा खुबीने वापर करून शिवराज गोर्ले यांनी एक बंदिस्त गतिमान पटकथा पेश केली आहे. चित्राचे एकंदर स्वरूप हिंदी सिनेमाशी मिळते जुळते असले तरी मराठी चित्रपटाच्या संदर्भात त्याचे वेगळेपण निश्चित जाणवते. संघर्षासाठी प्रमुख व्यक्तिरेखांचा व त्यांच्या पूर्वायुष्यातील प्रसंगाचा कल्पकतेनं वापर करून प्रेक्षकाला पूर्णपणे गुंतवून ठेवत चित्र अखेरच्या संघर्षापर्यंत नेले आहे. शिवराज गोर्ले हे एक चतुर लेखक आहेत, यात शंकाच नाही!
- शरद गोखले (सिनेमा-सिनेमा)
