प्रेरक साहित्य - सुजाण पालक व्हावं कसं ?

सुजाण पालक व्हावं कसं?
पालक ‘असणं’ वेगळं आणि
पालक ‘होणं’ वेगळं,
पालक होणं हे एक ‘घडणं’ असतं.
आजच्या काळात पालक होणं
म्हणजेच ‘सुजाण पालक’ होणं.
पालक होणं म्हणजे
सगळं जग पुढे चाललं असताना
मुलं तेवढी मागे राहू नयेत,
याची दक्षता घेणं.
आजच्या काळात
मुलांच्या मनांवरचे ताण वाढताहेत
म्हणूनच पुन्हा नव्यानं
‘ममत्वा’चं महत्व समजून घेणं.
पालक होणं म्हणजे
प्रथम मातृत्वाचं वास्तव स्वीकारणं.
स्त्रीच आपल्या अपत्याचं
संगोपन आणि बुद्धीचं संवर्धन
अधिक चांगलं करु शकते,
हे शास्त्रीय सत्य स्वीकारणं.
त्यासाठीच आईनं आपल्या आयुष्यातील
किमान चार वर्षं
फक्त बाळासाठी बहाल करणं.
पालक होणं म्हणजे
‘मूल’ दोघांचं असतं,
याचं भान दोघांनीही ठेवणं.
आईबरोबरच बाबांनीही,
बाळाच्या संगोपनात सहभागी होणं.
पालक हे फक्त पालक नसतात...
ते शिक्षक असतात, ‘डॉक्टर’ असतात,
‘आहारतज्ज्ञ, ‘मानसतज्ज्ञ’
असं बरंच काही असतात...
म्हणूनच शक्य तितकी सारी
पालकत्वाची कौशल्यं आत्मसात करणं.
पालक होणं म्हणजे
मुलांची भाषा वेगळी असते, हे ओळखणं,
शब्दांच्या आड दडलेले
त्यांच्या मनीचे ‘भाव’ जाणून घेणं.
ते व्यक्त करण्यासाठी
प्रसंगी त्यांना ‘शब्द’ही पुरवणं!
पालक होणं म्हणजे
ऑर्डरी न सोडणं, अटी न घालणं
धमक्या किंना प्रलोभनंही न देणं.
कौतुकही मुलाचं न करता
त्यानं केलेल्या कामाचं करणं.
‘बावळ्या’ किंवा ‘डँबिस’
अशा विशेषणांची लेबलं न चिकटवणं.
पालक होणं म्हणजे
मुलांसाठी फक्त प्रेमच नव्हे, तर
पुरेसा वेळही देणं.
मुलांच्या वाढत्या मेंदूलाही
पुरेसं ‘खाद्य’ पुरवणं.
बालवयात शिकलेलं
आयुष्यभर कामी येतं
याचं भान ठेवणं.
स्पर्श, स्वाद, रंग, गंध, नाद
अशा साऱ्या संवेदनांसाठी
नित्य नवे अनुभव देणं.
केलेलं लक्षात राहतं म्हणून
त्यांना खूप काही स्वतः करु देणं.
पालक होणं म्हणजे
मुलांशी सतत बोलत राहणं.
शब्द हेच ज्ञानाचं माध्यम असतं
म्हणूनच मुलांना रोज नवे ‘शब्द’ देणं.
पालक होणं म्हणजे
मुलांचा प्रारंभीचा अभ्यास
हसत, खेळत – आनंदात होईल,
याची दक्षता घेणं.
खेळ हाही अभ्यासच असतो,
याचं पुरेसं भान ठेवणं.
त्यांना चित्र काढू देणं,
संगांशी खेळू देणं,
आनंदानं शिकण्यासाठी
त्यांना निसर्गात रमू देणं.
पालक होणं म्हणजे
मुलांपुढे ‘परीक्षेचा राक्षस’ उभा न करणं.
मुलं अभ्यास किती करतात,
यापेक्षा कसा करतात, इकडे लक्ष देणं.
मुलांना शिकायला आवडतं,
ताण घ्यायलाही ती तयार असतात;
पण हे ताण केवळ
परीक्षांचे, स्पर्धांचे नसतील,
शिकण्यातल्या आव्हानांचे,
शिकण्यातल्या आनंदाचे
आणि मुलांचा खरा विकास घडवणारे
असतील, याची दक्षता घेणं.
पालक होणं म्हणजे
पोरांचा पोरपणा मान्य करणं.
मुलांना मोठं करण्याच्या नादात
त्यांचं मूलपण हरवू न देणं.
पालक होणं म्हणजे
आपल्या अपेक्षांचं ओझं
मुलांच्यावर न लादणं.
त्यांना आंतरिक ऊर्मीनं फुलू देणं.
पालक होणं म्हणजे
शिस्तीच्या नावाखाली
मुलांना धाकात न ठेवणं,
प्रेमाच्याही नावाखाली
फाजील लाड न करणं.
काही गोष्टीत मुभा अन् काही गोष्टींत मर्यादा
यांचा समतोल राखणं,
काही बाबतीत ठाम राहणं,

मात्र त्यासाठी कठोर न होणं.
शिक्षा करतानाही ती
अद्दल घडवणारी नव्हे,
तर बदल घडवणारी असेल,
याची दक्षता घेणं.
शिक्षेबरोबरच शाबासकीचंही
‘शिस्ती’ मधलं मोल जाणणं.
पालक होणं म्हणजे
आजच्या काळातील
माध्यमाचा प्रभाव ओळखणं,
आपण मुलांच्या हाती
माध्यम देत आहोत
की मुलांनाच माध्यमांच्या
हाती सोपवत आहोत,
याचा गंभीरपणे विचार करणं
पालक होणं म्हणजे
प्रत्येक मूल हे एक
स्वतंत्र अस्तित्व असतं,
हे मान्य करणं.
मुलंही ‘माणसं’च असतात,
त्यानांही मन असतं,
राग असतो, लोभ असतो,
द्वेष, असूया, मत्सर असतो
हे सत्य स्वीकारणं
राग आणि मत्सर
हाताळावा कसा,
याचं मुलांना शिक्षण देणं.
स्वतःच्याच वागण्यातून
त्यासाठी प्रात्यक्षिक देणं.
पालक होणं म्हणजे
मुलांना आत्मस्वीकार
आणि आत्मविश्वास देणं.
त्यांची ‘स्वप्रतिमा’ सकारात्मक करणं.
द्यायचंच असेल मुलांना काही
तर समतोल आणि समृध्द असं
व्यक्तिमत्व देणं.
पालक होणं म्हणजे
आपण मुलांना वाढवतो
असं वाटत असलं, तरी
तीच आपल्याला वाढवत असतात,
याचं भानं ठेवणं.
मुलांना मूलपणाचा
आनंद घेऊ देणं
आणि आपणही
पालक असण्यातला आनंद अनुभवणं!...

वाचक लिहितात..
मा. शिवराज गोर्ले यांस
तुमची सर्वच पुस्तकं मी आवर्जून वाचत असते. ‘मजेत जगावं कसं?’ ची तर पारायणंच करीत असते. प्रदर्शनात तुमचं नवं ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ हे पुस्तक दिसलं आणि पटकन उचललंच. सलग बैठकीत वाचून काढलं.
मी मुलाकडे राहते. त्याचं लग्न झालंय. एक मुलगा आहे. सुनबाईचं माझं फारसं पटत नाही. विशेषतः मुलावरून कुरबुरी होतात. मध्यंतरी त्या इतक्या वाढल्या की मी सरळ माझ्या स्वतःच्या फ्लॅटवर एकटीच राहत होते.. मुलाच्या आग्रहावरून परत आले.
सांगायचा मुद्दा... तुमचं पुस्तक मी सुनेला वाचायला दिलं.. आणि गंमतच झाली. सून सर्व्हिस करायची – तिनं आता तिथेच ‘पार्ट टाइम जॉब’ घेतला आहे. ती निम्मा वेळ घरात राहते. मुलाकडे लक्ष देते. त्यामुळे मलाही आता बाहेर जाता येतं. आमच्यातल्या कुरबुरी बऱ्याचशा कमी झाल्या आहेत.
हा बदल कशामुळे झाला, हे काही मी सुनेला विचारले नाही. पण तुमच्या पुस्तकामुळे ती ‘सुजाण’ झालीय आणि ‘पालक’ ही झालीय, हे मला तरी स्पष्ट जाणवतंय. आता मी हे पुस्तक इतरांच्या सुनांनाही भेट म्हणून द्यायचं ठरवलंय. आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद

आपली
सुशीला नेने, पुणे