महेश कोठारे दिग्दर्शित ‘थरथराट’ चित्रपटाद्वारे गोर्लेंनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं. ‘थरथराट’नं अभूतपूर्व यश मिळवलं. रौप्यमहोत्सव साजरा झाला. ‘थरथराट’च्या यशात अर्थातच महेशजींचं गतिमान दिग्दर्शन, जबरदस्त पटकथा, लक्ष्मीकांत बेर्डेंचा अफलातून अभिनय, राहुल सोलापूरकर याचा टकलू हैवान... या साऱ्याचाच वाटा होता. पण गोर्लेंच्या संवादांचंही योगदान निश्चित होतं. त्याचीच पावती म्हणून की काय – ‘व्हीनस’ कंपनीनं ‘थरथराट’च्या संवादांची (व गीतांची) कॅसेटही प्रस्तुत केली. त्यापूर्वी मराठीत पक्त दादा कोंडकेंच्या चित्रपटांतील संवादांच्या कॅसेटस् निघत होत्या! रंगभूमीप्रमाणेच रुपेरी पडद्यावरील गोर्लेंचं पदार्पणही कमालीचं यशस्वी ठरलं. महेश्जींबरोबर चांगलंच ‘ट्यूनिंग’ जमल्यानं पुढे ‘लेखक-दिग्दर्शक’ अशी त्यांची जोडी जमली.
