‘पु. लं. च्या नंतर मराठी विनोद संपला!’ असं कवयित्री शांता शेळके यांनी जाहीरच केलं होतं. अर्थात त्यामुळे अनेक (ह्यात असलेले) ज्येष्ठ विनोदकार दुखावलेही गेले होते. पण शांताबाईंचं विधान पु. ल. प्रेमापोटी थोडं अतिरेकी वाटत असलं – तरी त्यात तथ्य होतंच.
गोर्लेंच्या मते शांताबाईंच्या विधानातलं ‘तथ्य’ मान्य केलं, तरीही एक सत्य त्यांनी नजरेआंड केलं होतं. ‘पुलं’ नंतर भले मराठी साहित्यातला विनोद संपला (किंवा रोडावला) असला – तरी मराठी माणसातला विनोद संपला नव्हता. तो तर साहित्यात येऊ शकत होता!
फक्त एवढंच की तो टिपण्याची दृष्टी हवी होती, आणि ती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची शैली. आपल्याकडे दोन्ही आहे, याविषयी गोर्लेंची खात्री होती. म्हणूनच गोर्लेंनी एक साहित्यिक साहस करायचं ठरवलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’चा एवढा दबदबा होता की त्यानंतर विनोदी व्यक्तिचित्रं लिहिण्याचा विचारही कुणी केला नव्हता.
गोर्लेंनी नेमका तोच (अ) विचार केला.
‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘नग आणि नमुने’ मध्ये साम्य आहे ते मुख्यतः माणसातील विनोद टिपण्याच्या दृष्टीचं. ते अपरिहार्य आहे कारण गोर्लेनी ती ‘दृष्टी’ पु. लं. कडूनच घेतलेली आहे.
मात्र महत्वाचा फरकही आहे. ‘नग आणि नमुने’ तील पात्रे गोर्लेना प्रत्यक्षात भेटलेली आहेत. त्यांच्याशी झालेले संवाद, प्रसंग हे खरे घडलेले आहेत. निवेदनात थोडंसं स्वातंत्र्य घेतलेलं आहे तेवढंच. काही पात्रांची नावंही (त्यांची संमती मिळवून) तीच ठेवली आहेत.
केवळ विनोदासाठी किंवा व्यक्तिरेखा, साहित्य दृष्टया संमिश्र/गहिऱ्या वगैरे करण्यासाठी गोर्ले यांनी काहीही ‘बेतलेलं’ नाहीय. शेवट करताना पु. लं. प्रमाणे माणुसकीचा स्पर्श असलेली भावनिक डूब ही त्यांनी दिलेली नाही. या मागची भूमिका सांगताना गोर्ले म्हणतात-सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं-तसंच सत्य हे कल्पितापेक्षा ‘विनोदी’ही असू शकतं, हे गोर्लेंना दाखवायचं होतं. असे ‘नग.. आणि नमुने..’ अशी माणसं.. खरोखर आहेत, असतात, हे कळल्यानं वाचनातील खुमारी वाढेल, असं गोर्लेंना वाटत होतं आणि झालंही तसंच. तेच ‘नग आणि नमुने’चं ‘व्यक्ती आणि वल्ली’ पेक्षा वेगळेपणही ठरलं.
वाचक लिहितात...
तुमचं ‘नग आणि नमुने’ वाचल्यापासून ‘ठ्यांS’ करून वेडयासारखा हसतोच आहे. पु. ल. वाचल्यानंतर जसा हसत असे (आणि स्वतः ‘पु. ल.’ तो पी. जी. वुडहाउस वाचून जसे ‘ठ्यां’ करून हसत असत) अगदी तसाच.
पु. लं. खेरीज दुसऱ्या कुठल्याही लेखकानं आम्हाला असं हसवून ‘चितपट’ केलं नव्हतं... तुम्ही मात्र केलंत. मान गये उस्ताद! यूंही हंसाते रहो.
आपला चाहता,
मकरंद महाजन
नाशिक
श्री शिवराज गोर्ले यांस
सप्रेम नमस्कार
आपल्या ‘नग आणि नमुने’ या पुस्तकास ‘वि. मा. दि. पटवर्धन पुरस्कार मिळाला. त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
मी वि. मा. दिं. चीच कन्या. घरातच विनोदी लेखक असल्यामुळे आम्ही (म्हणजे आम्ही दोघं, आमची मुलं) निखळ विनोदाचे – विशेषतः पी. जी. वुडहाउस चे भक्त! चांगल्या विनोदावरच आम्ही निम्मे जगतो, म्हटलं तरी चालेल! आपल्याला पुरस्कार मिळाला याचा मला विशेष आनंद झाला, कारण आपली काही व्यक्तिचित्रे मी पूर्वी दिवाळी अंकामधून वाचली होती आणि खरं सांगते – अलिकडच्या दिवाळी अंकामधून प्रथमच एवढं आनंददायक वाचायला मिळालं होतं.
आपण ‘नग आणि नमुने’ पु. लं.च्या थाटात उभे केलेले असले तरी ते काही बाबतीत सरसही उतरले आहेत.
आपली
सुमन बेहरे
(नाशिक रोड)
प्रिय श्री. शिवराज गोर्ले
स. न.
नुकताच ‘नग आणि नमुने’ वाचायला घेतलेय. भट्टी छानच जमलीय. वाचता वाचता सारखी स्वतःशीच हसत होते. मस्तच! सध्या मी घरच्या आणि ऑफिसच्या व्यापात प्रचंड डुबलेली आहे. त्यात काही ‘कटकटी’ ही असतातच. पण त्यातही तुमचं ‘नग आणि नमुने’ आणि माझा छोटा देवांग... या दोन गोष्टी मात्र आनंददायक आहेत. अतिशयोक्ती नाही. मनापासून वाटलं म्हणून लिहिलं आहे.
देवयानी कुलकर्णी – अभ्यंकर
(कॉन्टीनेन्टल प्रकाशन)
माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकलेला. सध्या बारावीला आहे. मराठी अजिबातच वाचत नाही. मात्र तुमच्या ‘नग आणि नमुने’ या ऑडिओ बुक मधून ‘रंगा लिखिते’ त्याला ऐकवला. तो अक्षरशः वेडाच झाला. आता तो स्वतःच तुमची एक एक व्यक्तिरेखा मजेत ऐकत असतो. आम्हाला आनंद आहे की आमचा मुलगा निदान मराठी साहित्य ‘ऐकू’ लागला आहे.
तुम्हाला अगदी मनःपूर्वक धन्यवाद आणि ‘रिअलायझेशन्स मिडिया’ लाही.
विद्याधर जमादार, पुणे
(रिअलायझेशन्स मिडिया संपर्क ९८२२०२४६७४)
